चिनाब नदीवर आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल

0

जम्मू । जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर आगामी 2 वर्षांच्या कालावधीत जगातील सर्वात उंच रेल्वे पूल तयार केला जात असून, याची उंची आयफेल टॉवरपेक्षा जवळपास 35 मीटरने अधिक असणार आहे. दुर्गम क्षेत्रात जवळपास 1100 कोटी रुपयांचा खर्च येणा़र्‍या अर्धचंद्र आकाराच्या मोठ्या पुलासाठी 24000 टन स्टीलचा वापर केला जाईल आणि हा पूल नदीच्या पात्रापासून 359 मीटर उंचीवर असणार आहे.

रेल्वे अभियांत्रिकीचा अजोड ठरणारा हा पूल ताशी 260 किलोमीटर वेगाने वाहणार्‍या वार्‍याचा मारा ही सहन करू शकेल. 1.315 किलोमीटर लांबीचा हा पूल बक्कल कटरा आणि श्रीनगरच्या कौडीला जोडणार आहे. हा पूल कटरा आणि बनिहालदरम्यान 111 किलोमीटरच्या भागाला जोडणार असून हा भाग उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वेसंपर्क योजनेचा हिस्सा आहे. पुलाची निर्मिती काश्मीर रेल्वे प्रकल्पाचा सर्वात आव्हानात्मक हिस्सा असून तो पूर्ण झाल्यावर अभियांत्रिकीचा आविष्कार ठरेल असे एका अधिकार्‍याने सांगितले. हा पूल 2019 साली पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. हा पूल या भागात येणार्‍या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल अशीही आशा आहे. पूल उभा राहिल्यानंतर बेइपैन नदीवर असलेल्या चीनच्या शुईबाई रेल्वेपुलाचा (275 मीटर) विक्रम तो मोडीत काढेल. पुलाच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. या पुलामुळे राज्यात आर्थिक विकास आणि वाहतूक वाढण्यास मदत मिळणार आहे.

हा पूल स्टीलने उभारला जाणार असल्यामुळे उणे 20 अंश सेल्सिअस तापमानाचाही या पुलावर त्याचा कोणता प्रभाव होणार नाही. हा पूल 250 किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने वाहणार्‍या वार्‍यांना झेलू शकतो, या वार्‍यांचा वेग मोजण्यासाठी या पुलांना सेन्सर लावण्यात आले आहेत. वार्‍याचा वेग 90 किलोमीटरपेक्षा अधिक झाल्यास सिग्नल लाल होणार आहे. यानंतर रेल्वेला रोखले जाईल. काश्मीरमध्ये होणार्‍या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर यात 63 मिलीमीटर जाड ब्लास्टप्रूफ स्टील वापरण्यात आले आहे. याचे खांबदेखील स्फोट सहन करू शकतील, अशा रचनेने तयार करण्यात आले आहेत.

विशेष रंग वापरणार
या पुलाला गंज चढू नये याकरिता यावर विशेष प्रकारच्या रंगाचा वापर करण्यात आला आहे, जो 15 वर्षे टिकेल. योजनेनुसार या पुलात एक ऑनलाइन देखरेख आणि इशारा यंत्रणा लावली जाईल, जेणेकरून प्रवासी आणि रेल्वेची अवघड समयी सुरक्षा होऊ शकेल. यात पायी आणि सायकलने जाणा़र्‍यांसाठी स्वतंत्र मार्ग असेल.