कोलकाता । चिनी बनावटीची प्लास्टिकची नकली अंडी विकल्याप्रकरणी एका दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद शामिम अन्सारी असे या दुकानदाराचे नाव असून, त्याला कोलकाता येथून शुक्रवारी अटक करण्यात आली. करिया पोलीस ठाण्यामध्ये अनिता कुमार या महिनेले दिलेल्या तक्रारीवरून अन्सारी याला अटक करण्यात आली. अनिता कुमार यांनी अन्सारी याच्या दुकानातून अंडी खरेदी केली. घरी गेल्यावर या अंड्यांचे आम्लेट बनवले असता ती प्लास्टिकची असल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे अनिता कुमार यांनी पोलिसांता धाव घेतली आणि तक्रार दिली. चिनी बनावटीच्या प्लास्टिकच्या नकली अंड्यांचा बाजारात सुळसुळाट झाल्याच्या बातम्या यापूर्वीच बाजारात आल्या होत्या. मात्र, याप्रकरणी प्रत्यक्ष अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे.
दरम्यान, अन्सारीने दावा केला आहे की, आपण खरेदी करतो ती अंडी घाऊक विक्रेत्याकडून करतो. त्यामुळे ही अंडी नकली असू शकत नाहीत तसेच आपण आंध्र प्रदेशच्या एका घाऊक व्यापार्याकडून सुमारे दीड लाख रुपयांची अंडी विकत घेतली आहेत तसेच ही अंडी जर नकली असतील तर, त्यानेच कदाचित ही अंडी चीनमधून विकत घेतली असावीत. या प्रकारानंतर कोलकात्यात एकच खळबळ उडाली असून, अन्सारी यांच्या दुकानातील अंडी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत. तसेच, कोलकात्याचे महापौर अतिन घोष यांनीही या प्रकरणात लक्ष घातले असून, त्यांनी कोलकात्यातील अनेक अंडी विक्रेत्यांच्या दुकानात जाऊन पाहाणी केली.
अंडे खाल्ल्यावर अंगावर पुरळ
तक्रार नोंदविताना अनिता कुमार यांनी पोलिसांन माहिती देताना सांगितले की, डॉक्टरांनी माझ्या मुलाला दररोज एक अंडे खाण्यास सांगितले आहे. डॉक्टरांनी दिलेला सल्ला पाळण्यासाठी आम्ही मार्केटमधून आम्ही एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर अंड्यांची खरेदी करून ठेवतो. ही अंडी आम्ही एकाच ठिकाणावरून खरेदी करीत होतो. मात्र, ही अंडी खाल्ली की, माझा मुलगा आजारी पडतो असे माझ्या निरीक्षणास आले. त्यामुळे ही अंडी खराब असतील, अशी माझी खात्री झाली.
ही अंडी खाल्ल्यावर मुलाच्या अंगावर पुरळही येत असत, असेही अनिता कुमार यांनी सांगितले. अधिक माहिती देताना अनिता कुमार म्हणाल्या, माझी शंका अधिक वाढल्यावर मी माचिस पेटवून अंड्याजवळ धरली. पाहते तर, अंड्याचे कव्हर जळत होते आणि त्यातून प्लास्टिक जळाल्याचा वासही येत होता. त्यामुळे ही अंडी बाजूला ठेवून मी दुसर्या दुकानातून अंडी आणली तर, ती अंडी चांगली होती. त्यातून प्लास्टिक जळल्याचा वासही येत नव्हता. त्यानंतर मात्र, ही अंडी नकली असल्याची माझी खात्री पटली आणि मी पोलिसांत तक्रार दिली, असे अनिता कुमार सांगतात.