जळगाव । ‘मनात सध्या एकच विचार, चिनी मालावर बहिष्कार, मेड इन इंडिया पहला प्यार, भारत मातेचा जयजयकार’, अशा घोषणांच्या निनादात हजारो बालसैनिकांनी आज येथे चिनविरुद्ध यल्गार पुकारला. श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशिय मंडळाच्या चिनी वस्तूंवरील बहिष्कार आंदोलनाचा एक भाग म्हणून सकाळपासून विविध विद्यालयांतील ही चिमणी पाखरे आर. आर. शाळेच्या प्रांगणात एकत्रित आली. चिमणपाखरांनी चिनविरुद्ध चिवचिवाटही केला आणि आपापल्या कुटुंबीयांना तसेच शेजार्यांनाही या आंदोलनात सहभागी करून घेण्याची प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली. हजारोंच्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांचा एकत्रित आवाज चिनविरुद्ध रणदुदूंभीच भासत होता. प्रतिज्ञेची पहिली ओळ आकाशात घुमली तसे लगतच्या इमारतींतून लोक आपापल्या गॅलरीत आले. पादचारी, दुचाकीस्वार थबकले. शाळेच्या प्रांगणाभोवती मोठ्या संख्येने प्रेक्षक जमले.
अशी घेतली प्रतिज्ञा
“मी शपथ ग्रहण करतो, करते की या क्षणापासून चिनमध्ये तयार झालेली कुठलीही वस्तू विकत घेणार नाही. चिन्यांच्या कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही. इतर देशबांधवांना आणि भगिनींनाही चिनी माल खरेदीपासून परावृत्त करेन. सीमेवरील जवानांप्रमाणेच सीमेत राहून देशहिताचे रक्षण करेन मी माझ्या मातृभूमीसाठी कुठल्याही बलिदानास तयार राहीन.”
मंत्र्यांकडून शपथ
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, दीपकराव घाणेकर यांनी प्रतिज्ञावाचन सुरू केले आणि या द्वयीपाठोपाठ विद्यार्थ्यांनी पुनरुच्चार केला, तेव्हा जणू आसमंत दणाणून गेले. भरत अमळकर यांनी चिमणपाखरांना एका चिमणीचीच छान व प्रेरक गोष्ट सांगितली. “एकदा जंगलात वणवा पेटवला गेला तेव्हा सारे प्राणी आणि पक्षी तो विझवण्यासाठी आपापल्या परीने कामाला लागले. हत्ती सोंडेने पाणी घालू लागला. गरुडाने वरून आपल्या ताकदीबरहुकूम फवारणी सुरू केली. एक चिमणीही चोचीने एकेक थेंब पाणी आणून मदतीला भिडली. कुणीतरी तिची टिंगल केली, की तुझ्या चोचभर पाण्याने काय होणार आहे. चिमणी त्यावर म्हणाली, जेवढे व्हायचे तेवढे होईल, पण जेव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा माझे नावही आग विझवणार्यांच्या यादीत असेल, लावणार्यांच्या नव्हे”, ही गोष्ट सांगून अमळकर म्हणाले, “चिनविरुद्ध प्रसंगी सैनिक सीमेवर लढतीलच, पण आपणही या देशाचे नागरिक म्हणून आपली जी काय लहानमोठी शक्ती आहे, तिचा वापर चिनविरुद्ध करायला हवा. तुम्ही लहान असलात तरी तुमची शक्ती महान आहे. चिनी मालावर बहिष्काराचा हा संदेश तुम्ही घरी आणि शेजारीपाजारी पोहोचवा.” अमळकर यांच्या या गोष्टीला आणि त्यामागील प्रेरक संदेशाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नागरिक म्हणून भूमिका
विवेकानंद मंडळाचे अध्यक्ष तसेच नगरसेवक कैलास सोनवणे यांनी आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘सरकार सरकारची भूमिका पार पाडते आहे. सैनिक त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. तद्वतच नागरिक म्हणून मी देशाला काय देणे लागतो, याचा विचार प्रत्येकाने आपापल्या पातळीवर करायला हवा. मला या क्षणाला चिनी वस्तूंवर बहिष्काराचे शस्त्र फार मोलाचे वाटते आहे. ते देशहिताचे रक्षण करणारे आहे, अशी माझी ठाम धारणा आहे आणि म्हणूनच माझ्या शहरापुरते मी ते उपसलेले आहे.’