मुंबई : मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर ठाणे पालघर आणि सिंधुदूर्गमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. इतकंच नाहीतर रायगड, कोल्हापूर, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी रात्रीपासून कोकणात मुसळधार पाऊस होत असून, अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे चिपळूनमध्ये दाणादाण उडाली आहे. पावसाचा कहर सुरू असून, तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला वेढा दिला आहे. शहराच्या अनेक भागात पाणी शिरलं असून, अंतर्गत मार्गही बंद झाले आहेत. यामुळे चिपळूनमध्ये २००५ ची पुनरावृत्ती होते की काय या धास्तीने नागरिकांची झोपच उडाली आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. दरम्यान एनडीआरएफची तुकडी पुण्याहून चिपळुणात दाखल झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात विक्रमी पाऊस
नाशिक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत तुफान पाऊस कोसळत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले असून त्र्यंबकेश्वर मंदिरातही सध्या पाणी असल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे सूरगाणा तालुक्यातही नदी नाले दुथडी भरून वाहत असून झगडपाडा गावाजवळ असलेल्या शिवनदी पुलावर पाणी आल्याने डझनभर गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
पाऊस सुरूच राहिल्यास व पाणीसाठ्यात आणखी वाढ झाल्यास दारणा जलाशयातून आणखी विसर्ग करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात विक्रमी ९३५ मिलीमीटर पाऊस झाला. पेठमध्ये अतिवृष्टी झाली इथे ३१५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. इगतपुरीत २४०, त्रम्बकेश्वर येथे २१६ मिमी पाऊस झाला आहे. सुरगाण्यातही ४५ मिलीमीटर पावसाची नोंद तर जुलै महिन्याच्या सरासरीच्या ६५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
रेल्वे वाहतूक ठप्प
खंडाळा घाटात मुंबई पुणे लोहमार्गावर मंकीहिल ते पळसदरी दरम्यान अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने मुंबई पुणे. लोहमार्गावरील रेल्वे सेवा पूर्वपणे ठप्प आहे. कोकण रेल्वेची वाहतूक पाणी ओसरेपर्यंत ठप्प, कोकण रेल्वेच्या मार्गावरील वाहतूक चिपळूणजवळ थांबवली. चिपळूण परिसरात मुसळधार पावसाने वाशिष्ठी पुलाखाली पाण्याची पातळी वाढल्याने धोक्याची सूचना देण्यात आली आहे. अनेक ट्रेन स्टेशन वर रखडल्या आहेत. अंबरनाथ, बदलापूर दरम्यान अनेक ठिकाणी रुलावरील खडी वाहून गेल्याने कर्जत ते अंबरनाथपर्यंत रेल्वे वाहतूक ठप्प आहे.