चिपळूणातील परशुराम निसर्ग पर्यटन केंद्राकडून अमूल्य मदत

0

चिपळूण : साहित्यिक, वाचक आणि प्रकाशकांचे डेस्टिनेशन म्हणून उदयाला येऊ घातलेल्या, देशाच्या इतिहासात ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नोंद झालेल्या महाबळेश्वर नजीकच्या ‘भिलार’ गावी, चिपळूण तालुक्यातील पहिले कृषी पर्यटन केंद्र असलेल्या आणि पुस्तक निर्मितीच्या माध्यमातून डॉक्युमेंटेशनचे यशस्वी काम करणार्‍या पेढे येथील श्रीपरशुराम निसर्ग सानिद्ध्य पर्यटन केंद्राने प्रकाशित केलेल्या इतिहास, पर्यटन, चरित्र आदि साहित्य प्रकारातील पुस्तकांची, देशातील पहिल्या पुस्तकांचे गाव ‘भिलार’ला नुकतीच ग्रंथभेट देण्यात आली.

चिपळूण पर्यटनाच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेले, दहा वर्षांपूर्वी प्रकाशित ‘चिपळूण तालुका पर्यटन’, भगवान परशुरामाचे निवासस्थान असलेल्या महेंद्रगिरी पर्वतावरील विविध प्रेक्षणीय स्थळांची माहिती असलेले ‘श्री परशुराम तीर्थक्षेत्र दर्शन’ (मराठी आणि इंग्रजी आवृत्ती), कोकणातील एकमेव श्रीदत्त तीर्थक्षेत्र ‘श्रीक्षेत्र अवधूतवन’, भारतातील सर्वात मोठ्या धबधब्याची माहिती असलेले ‘ठोसेघर पर्यटन’ आणि ‘ग्रामसेवक ते समाजसेवक’, ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’ ही चरित्रे आणि कोकण नकाशा आदि पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर लिखित पुस्तके भेट देण्यात आली. यातील ‘चिपळूण तालुका पर्यटन’ ह्या पुस्तकाचे समीर कोवळे तर ‘ठोसेघर पर्यटन’ या पुस्तकाचे विलास महाडिक सहलेखक आहेत. तसेच नामवंत इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर लिखित ‘वाशिष्टीच्या तीरावरून’ हा संदर्भ ग्रंथही यावेळी भेट देण्यात आला. ही पुस्तके महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेचे बालाजी हळदे यांनी स्वीकारली. यावेळी धीरज वाटेकर, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते विलास महाडिक यांचेसह महाराष्ट्र शासनाचा ‘वनश्री’ पुरस्कार विजेते, प्रसिद्ध चंदनतज्ञ महेंद्र घागरे, गौरव धर्माधिकारी, प्रवीण कुंभार, देवयानी खानविलकर उपस्थित होते.

वाचनासाठी आवश्यक शांतता विचारात घेवून तो आनंद निसर्गाच्या सान्निध्यात मिळवून देण्यासाठी शासनाने भिलारची निवड केली. स्ट्रॉबेरीचे गाव म्हणून ओळख असलेले भिलार आता पुस्तकांचे गाव म्हणून देशाच्या सर्व भाषिक राज्यांमध्ये पोचले आहे. महाबळेश्वर अन् पाचगणी या दोन ‘हिलसिटी’च्या हिरव्यागार डोंगररांगाच्या कुशीत पहुडलेलं गावं म्हणजे भिलार. पाच-साडेपाचशे उंबर्‍यांच्या या गावात पहिल्या टप्प्यात पंचवीस घरे निवडली गेलीत. तिथे वेगवेगळ्या ग्रंथ-पुस्तकांनी सुसज्ज असं वाचनालय तयार झालंय. हे पुस्तकांचं गाव सतत किलबिलत राहावं, यासाठी वर्षभर इथे अनेक साहित्यिक उपक्रम राबविण्याचा शासनाचा मानस आहे.

महाबळेश्वरच्या निसर्गरम्य आणि चैतन्यदायी वातावरणात, पुस्तकांत रममाण होण्याचा आनंद काही औरच आहे. या अभिनव प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील असंख्य लिहित्या हातांना आपले साहित्य भेट निमित्ताने अत्यंत सजग आणि जागरूक वाचकांच्या हाती देण्याची एक संधी उपलब्ध झाली आहे.
– धीरज वाटेकर,लेखक व पर्यटन अभ्यासक