मुंबई :महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया मानला जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाची पहिली हवाई चाचणी १२ सप्टेंबरला होणार असून यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू तसेच खा. नारायण राणे या सगळ्यां सह एक विमान मुंबईकडून सिंधुदुर्गाकडे झेपावणार आहे. चिपी विमातळावर या विमानाचे ‘सेफ लॅण्डिंग’ होणार असल्याबाबत शंका नसली तरी २०१९च्या निवडणुकांत युतीचे राज्यात पुन्हा सेफ लॅण्डिंग होईल की नाही त्याबाबत तळकोकणात चर्चा रंगल्या आहेत. पहिल्या हवाई चाचणीत युतीच्या प्रमुख नेत्यांसोबत प्रभू आणि राणे अशी दोन मंडळी सोबत असली तरी पुढील राजकीय उड्डाणात ही मंडळी सोबत असतील की त्यांना टाचणी लागेल या चर्चेनेही गजालीला रंगत चढणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असून गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर अर्थात १२ सप्टेंबर रोजी विमानाच्या उड्डाणाची चाचणी होणार आहे. जिल्ह्यात प्रथमच विमानतळाची मुहूर्तमेढ रोवली जात असून १२ सप्टेंबरला एक खास विमान मुंबईकडून सिंधुदुर्गला रवाना होणार आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू तसेच माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचा समावेश असेल, असे खात्रीलायकरित्या कळते. राणे यांनी आजवर चिपी विमानतळाच्या उभारण्यासाठी पाठपुरावा केला असल्याने त्यांना वगळू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. चिपी विमानतळावर यावेळी एक कार्यक्रमही होणार आहे.