चिमणी उडाली ऽऽऽ कावळा उडाला…

0

लातूरच्या निलंग्यातून भाजपच्या शिवार यात्रेला हिरवा कंदील दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईकडे येण्यासाठी निघाले. त्यांच्या हेलिकॉप्टरने नियोजित वेळेनुसारच टेक ऑफ केलं होतं, पण काही क्षणातच ते हेलिकॉप्टर कोसळलं. क्षणभर कुणाला काहीच कळलं नाही आणि मग अचानकच एक धावपळ सुरू झाली… मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतचे त्यांचे सर्व सहकारी सुखरूप असल्याची खात्री झाली. फडणवीसांना रुग्णवाहिकेतून तातडीने लातूरच्या पालकमंत्र्यांच्या घरी नेण्यात आलं. तिथे त्यांच्यावर प्रथामोपचार करून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं माध्यमांमध्ये अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलं. सर्वांनीच सुटकेचा नि:श्‍वास सोडला… मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची बातमी जशी प्रसार माध्यमांमध्ये पसरली तशी ती समाज माध्यमांमध्येही वार्‍याच्या वेगाने पसरली… सोशल मीडियात हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी धडकताच तिथे अतिशय खालच्या पातळीवरील विनोदांच्या पोस्ट अपलोड होऊ लागल्या. कुणी मुख्यमंत्री का बचावले? तर कुणी अरेरे..! ते बचावले का?, शेतकरी आत्महत्या करून मरतात पण हे हेलिकॉप्टर कोसळूनही बचावतात वगैरे वगैरे सारख्या पोस्ट सोशल मीडियात वाचायला मिळू लागल्या… एक माणूस अपघातातून बचावला यावर अशा प्रकारे विनोद करणं, हे नेमकं कुठल्या मानसिकतेचं लक्षण म्हणावं? दुश्मनालाही असं मरण येऊ नये, असं म्हणणारा हा समाज अचानकच इतका असंवेदनशील कसा काय झाला? कुठून आली एका माणसाबद्दलची इतकी घृणा? सोशल मीडिया खरोखरंच केवळ एवढ्यासाठीच आहे का? एखाद्याच्या मरणाची वाट बघण्याइतपत आपण निबर झालो आहोत, याचाही विचार कुणाला करावासा वाटू नये, हे समाजासाठी अत्यंत घातक आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर कसे कोसळले, याची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. त्या चौकशीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यावर नेमकं कारण कळेलच… पण तरीही या अपघातामुळे खरोखरंच काही प्रश्‍न उभे राहिले आहेत. ते अपघातग्रस्त हेलिकॉप्टर ज्या हेलिपॅडवरून उड्डाण घेणार होतं त्या हेलिपॅडवर म्हणे पाणी शिंपडलं नव्हतं. म्हणून हा अपघात झाला, असा कयास व्यक्त केला जातोय. हेलिपॅडवर पाणी न शिंपडल्यामुळे जेव्हा हेलिकॉप्टर हवेत झेपावलं तेव्हा मातीचा प्रचंड धुरळा उडाला. त्या धुरळ्यात पायलटला शेजारीच असलेला विजेचा खांब आणि त्या खांबावरील उच्च दाबाच्या विजेच्या तारा दिसल्या नाहीत. परिणामी, हेलिकॉप्टर त्या विजेच्या तारांमध्ये जाऊन अडखळलं… या कयासात बरंच काही दडलं…

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाने शिवार यात्रा सुरू केली आहे. या यात्रेची सुरुवातच लातूरमधून करण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांसाठी ही शिवार यात्रा काढण्यात आली, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र, त्याचवेळेस एक गंभीर गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे, जो जिल्हा मुळातच दुष्काळग्रस्त आहे. अशा जिल्ह्यात हेलिपॅडवर शिंपडण्यासाठी पाणी कुठून आणणार? आणि जरी ते पाणी आणून शिंपडलं गेलं, तर ती पाण्यासाठी वणवण करणार्‍या त्या दुष्काळग्रस्तांची केलेली चेष्टा नाही का ठरणार? दुसरी गंभीर गोष्ट म्हणजे, हेलिपॅड बनवताना त्या जागेची नीट पाहणी का करण्यात आली नाही? सर्वसाधारणपणे हेलिपॅडच्या आजूबाजूचा परिसर हा मोकळा असणं आवश्यक असतं. म्हणजेच त्या जागेच्या भोवताली उंच बांधकाम नसावं… किंवा आकाशात उड्डाण करण्यासाठी कोणताही अडथळा नसावा, याची काळजी घेणं क्रमप्राप्त असतं. मग असं असताना त्या हेलिपॅडच्या जागेत विजेचा खांब आणि त्यावर विजेच्या उच्च दाबाच्या तारा आल्याच कशा? हेलिकॉप्टर लँड करतानाही या गोष्टी का लक्षात घेतल्या गेल्या नाहीत? या आणि अशा अनेक प्रश्‍नांची उत्तर चौकशी अहवालात असण्याची शक्यता बाळगायला काहीच हरकत नाही. मात्र, विकासाचं स्वप्न दाखवणार्‍या सरकारने ओव्हरहेड वायरबाबत उत्तर द्यायलाच हवं. ओव्हरहेड वायर हे अविकसनशीलतेचं लक्षण आहे, हे वेगळं सांगायला नको… या अपघातातील तिसरा गंभीर मुद्दा म्हणजे मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर ज्या घरावर कोसळलं त्या घरातील माणसं अजूनही रस्त्यावरच आहेत. त्यांना चूलही पेटवू दिली जात नाहीय. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तरी त्या कुटुंबाची तत्काळ भेट घेऊन त्यांना तातडीची मदत देणं अपेक्षित होतं. ती मदत पुरवून मगच मुख्यमंत्र्यांनी मुंबईकडे रवाना होणं गरजेचं होतं. पण अफसोस… यातलं काहीच घडलं नाही…

आणि म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातातून नक्कीच काहीतरी बोध घेणं गरजेचं आहे. देश तर खराच, पण राज्यही अविकसनशील असेल, तर मग विकासाच्या गप्पा कशासाठी मारल्या जात आहेत? शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली, तर राजकारण कोणत्या मुद्द्यावर करायचं, हा प्रश्‍न सरकार आणि विरोधक या दोघांनाही सारखाच भेडसावतोय, हे सुज्ञ जनता जाणून आहेच. त्यामुळे किमान तुमचे जीव धोक्यात येणार नाहीत, अशा नागरी सुविधा तरी सरकार नि विरोधकांनी निर्माण करण्यास काय हरकत आहे?
राकेश शिर्के – 9867456984