चिमुकले मांडणार चार गतीतून सिद्ध गतीपर्यंतचा प्रवास

0

जळगाव । शहरातील ओसवाल मंगल कार्यालयात अखिल भारतीय जैन संस्कृती रक्षक संघ व जळगाव स्थानकवासी जैन श्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात बालसंस्कार शिबिर सुरू आहे. गुरूवार 28 डिसेंबर रोजी या शिबिराच्या समारोपप्रसंगी सहभागी शिबिरार्थी चिमुकले चार गतीपासून सिद्ध गतीपर्यंतचा प्रवास प्रस्तुत करणार असल्याची माहिती पारस टाटीया व ललित बरडीया यांनी पत्रकार परिषदेत दिली. अ.भा. जैन संस्कृती रक्षक संघ व जळगाव स्थानकवासी जैन श्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चिमुकल्यांना धार्मिक शिक्षण व संस्कार देण्यासाठी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा समारोप उद्या दि.28 रोजी ओसवाल मंगल कार्यालयात सकाळी 10.30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी संघपती दलुभाऊ जैन, रतनलालजी बाफना, कस्तुरचंदजी बाफना, नैनसुखजी लुंकड, प्रकाशचंदजी समदडीया, अशोक जैन हे प्रमुख पाहुणे राहणार आहेत. मालेगाव येथील गौतमजी मालू यांच्या हस्ते हिरालालजी बुरड यांची महाराष्ट्र जैन संस्कृती रक्षक संघ जोधपूर शाखेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे.

प्रदर्शनीचे आयोजन
जिल्ह्यातील सर्व जैन बंधू-भगिनींनी ओसवाल मंगल कार्यालयात दुपारी 11.30 ते 1 या वेळेत होणार्‍या प्रदर्शनीला भेट द्यावी. तसेच या चिमुकल्यांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहित करावे, असे आवाहन पारस टाटीया व ललित बरडीया यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला पारस टाटीया, ललित बरडीया, हिरालालजी बुरड, प्रवीण टाटीया, नितीन चोरडिया, सरदारमल बुरड, सुरेश बुरड, ग्यानचंद बुरड, उज्वला टाटीया, नम्रता चोरडिया, रेखा काकलिया, सुलोचना कांकरिया, मोहिनी सांखला, चंद्रकला बुरड, सिमा खिंवसरा आदी उपस्थित होते.