मैदानेही पुन्हा खेळती झाली
पिंपरी : नवीन दप्तर…नवी पुस्तके… नवा कंपास घेऊन जुन्याच मित्रांना शाळेत नव्या सत्रात भेटण्याचा दिवस शुक्रवारी उजळला. त्यामुळे दीड ते दोन महिन्यांपासून ओस पडलेल्या शाळा आज पुन्हा चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या. विद्यार्थ्यांमुळे मैदानेही पुन्हा खेळती झाली. गुलाबपुष्प देत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या परीक्षा आटोपताच मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे वेध लागतात. सुट्ट्यांचा आनंद झाल्यानंतर मुलांना पुन्हा शाळेची ओढ सुरू होते. वर्गमित्र केव्हा भेटणार अशी आस त्यांना लागते. शाळेचे मैदान त्यांना खुणावते. त्यांच्या या प्रतीक्षेचा गोड शेवट झाला आणि शाळेचा पहिला दिवस उजाळला. शाळेत जाण्याची लगबग सकाळपासूनच सुरू झाली. माझा गणवेश कुठे आहे. माझे दप्तर कुठे आहे, असे म्हणत सकाळी घरी अनेकांचा कल्लोळ सुरू झाला. सकाळी 11 वाजता शाळेत शिरताच काही जुने तर काही नवे मित्र त्यांना मिळाले. आणि रंगल्या जुन्या गोष्टी.
शालेय साहित्याचे वाटप
शाळेत जाताच वर्गखोली, त्यातील बेंच डेस्क याच्याशी जुळलेल्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. गतवर्षी याच बेंच डेस्कवर बसून केलेल्या खोड्या, वर्गाला मारलेल्या दांड्या, कधी शिक्षकाची काढलेली छेड आठवताच हसणे टाळणे कठीण झाले. त्या गमती आपल्या वर्गमित्र मैत्रिणीसोबत वाटण्याचा आनंद शाळा सुटल्यानंतर बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर झळकत असल्याचे चित्र होते. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय साहित्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक शाळेत साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासह सामाजिक न्यायदिन साजरा करण्यात आला.
प्रवेशद्वाराजवळ रडण्याचा आवाज
ज्यांचा खरच शाळेचा पहिला दिवस होता. त्यांच्या डोळ्यात आईपासून दुरावण्याचे अश्रू दिसत होते. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ रडण्याचा आवाज शाळेच्या आवारात पसरत होता. असे असतानाही त्यांना पालकांना शाळेत सोडून काढता पाय घेतल्याचे चित्र होते. मात्र, शाळा सुटण्याच्या वेळी आपल्या मुलाला भेटण्याकरिता आणि त्याला घरी नेण्याकरिता पालकही आतूर असल्याचे चित्र शाळांच्या आवारात दिसत होते.