वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवरील शिक्षणाचे ओझे दिवसेंदिवस वाढत आहे. जितकी मोठी शाळा तितके मोठे दप्तर असे समीकरण आजच्या काळात झाले असल्याचे दिसते.वयाला न पेलणार्या वजनापेक्षाही दप्तर जड झाले आहे. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या तुलनेत केवळ दहा टक्के दप्तराचे ओझे असावे, असा शासनाचा नियम आहे. परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त पुस्तके विद्यार्थ्यांच्या दप्तरात असल्याचे दिसते.एनसीईआरटीने काढलेल्या परिपत्रकानुसार दुसर्या वर्गापर्यंत दप्तर घेऊन शाळेत येण्याची सक्ती नाही तरी देखील पुस्तके, वह्या, डबा, वॉटरबॅग, ड्रॉईंग बुक घेऊन शाळेत मुलांना पाठविले जाते. विद्यार्थ्यांच्या दप्तरात पुस्तकांचे वाढते ओझे हा विषय चिंतेचा झाला आहे. मात्र, या समस्येकडे ना शिक्षकांचे लक्ष आहे ना पालकांचे. विद्यार्थ्यांच्या पाठीवर असणार्या या ओझ्याकडे पालक आणि शिक्षक दोघेही सर्रास दुर्लक्ष करीत आहेत.
चिमुकल्यांच्या आरोग्यावर परिणाम…
दप्ताराचे ओझे जड झाल्याने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मुलांच्या एकूण वजानच्या 10 टक्क्यापेक्षा जास्त वजन दप्तराचे असू नये असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र याचा अवलंब होत नसल्याचे दिसते. दप्तराचे ओझे जड झाल्याने मुलांमध्ये पाठिच्या कण्याचे आजार होत आहे. यामुळे मुलांना सरळ उभे राहता येत नाही. ग्रामीण भागात दप्तराचे वजन कमी, तर शहरांतील शाळांमध्ये सीबीएसई, आयसीएसई शाळांची दप्तरे जास्त जड दिसून येतात. त्यामुळे चिमुकल्याना मणके, स्नायूंची झीज, डोकेदुखी, पाठदुखी, थकवा, वाढीवर परिणाम, मानसिक ताण,फुप्फुसांच्या कार्यक्षमतेत घट, सांधे आखडणे शिवाय पाठीच्या मनक्याचे जागेवरून सरकणे (कायकोसिस), मान दुखणे (स्पॉन्डेलायसिस), श्वासोच्छासाचे आजार वाढीस लागले आहेत. दप्तराच्या जड ओझ्यामुळे मुलांच्या वजन व उंचीवर देखील मोठा परिणाम झाला आहे. असे दुष्परिणाम 10 वर्षांपेक्षा लहान 58 टक्के मुलांना त्रास तर 12 वर्षांपेक्षा लहान 75 टक्के मुलांना त्रास होत आहे. या क्षेत्रातील तज्ञांच्या मते मुलांच्या वजनाच्या 15 टक्के वजनाचे दप्तर पाठीवर घेतले गेले तर खाद्यांचा आकार बदलतो, मान, पाठीचा कणा व कमरेच्या हाडावर दाब येऊन शरीराचे पोश्चरच बदलते.
आदेशाचे पालन नाही
मुलांचे ‘दप्तराचे ओझे’ कमी करण्यासाठी न्यायालयाने वारंवार आदेशही दिले आहे. त्यानुसार धोरण आखण्यात आले असले तरी हे धोरण योग्य पद्धतीने अमलात येत आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.‘दप्तराचे ओझे’ कमी करण्याबाबत 25 जुलै 2015 रोजी काढण्यात आलेल्या शासननिर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शाळांना 30 नोव्हेंबर 2015 पर्यंतची मुदत देण्यात आली होती.
डिजिटल शाळांचा काय उपयोग ?
महाराष्ट्र भर डिजिटल शाळा निर्मितीचे शासनाचे पर्व सुरु आहे. त्यामुळे डिजिटल झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणकावर शिकवण्यासाठी अधिक भर शिक्षकांनी दिला पाहिजे. कारण इ लर्निग चा वापर काळाची गरज आहे. पुस्तकांऐवजी ऑडिओ, व्हिडीओ स्वरूपात अभ्यास होणे गरजेचे आहे. ई-लर्निंग, टॅब्लेट पीसी, प्रोजेक्टर अशी डिजिटल क्लासरूम व्यवस्था निर्मिती शाळा व पालक सहभागातून करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
पालकांनीदेखील घ्यावी काळजी
प्रत्येक पालकाने मुलांच्या शाळेशी निगडीत सर्व साहित्य घरात एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी कपाट, रॅक, पेटी किंवा मोठी बॅग ठेवावी. त्यामध्ये शाळेसाठी त्या वर्षी लागणारे सर्व साहित्य ठेवावे. मुलांच्या दप्तरात फक्त तेवढेच साहित्य टाकावे जेवढे त्या दिवशी शाळेमध्ये लागणार आहे. बाकीचे साहित्य घरातील या विशिष्ट ठीकाणी ठेवावे. याच्या योग्य व्यवस्थापनासाठी शाळेच्या आदल्या रात्री पालकाांनी शाळेने दिलेले वेळापत्रक पाहून पुढील दिवसासाठी शाळेत लागणारे आवश्यक तेवढेच साहित्य दप्तरात टाकावे . बॅग विकत घेताना कमी वजनाची बॅग विकत घ्यावी जेणेकरुन बॅगेच्या वजनामुळे दप्तराचे वजन अत्याधिक वाढणार नाही. अधिकांश शाळांमध्ये मध्यान्ह भोजन दिले जाते. ज्या शाळांमध्ये दिले जात नाही तेथे विशेषत: सी.बी.एस्.ई / आय.सी.एस्.ई बोडांच्या शाळाांमध्ये आर्थिक दृष्ट्टया चांगल्यापालकांची मुले शिकतात. त्या शाळांमध्ये साधारणतः : उपहारगृहाची सोय असते.नसल्यास शाळा व्यस्थापन सोबत चर्चा करुन त्याची व्यवस्था केली पाहिजे .अशाप्रकारे सोय झाल्यास बहुतेक खाऊचा डबा दप्तरासोबत द्यावा लागणार नाही. तरी सुध्दा आवश्यक असल्यास शक्य तेवढ्या कमी वजनाच्या डब्यात खाऊ टाका , यामुळे दप्तराचे वजन मर्यादेत ठेवण्यास मदत होईल आता डिजायनर स्कूल बॅगची फॅशन आल्याने मुले विविध आकारतल्या दप्तरांच्या प्रेमात पडतात, मात्र यातून त्यांना धोकाच संभावतो. दप्तर आडव्या आकारातले असो किंवा उभ्या आकारातले. ते पाठीच्या खाली येणार नाही याची काळजी पालकांना घेणे गरजेचे आहे. उभे दप्तर वापरताना त्या दप्तराला पोटावर बांधणार पट्टा असल्यास वजन सहन करणे सोपे होते.
शिक्षकांनी राबवावी उपाय योजना
शिक्षकांकडून शालेय विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करण्याच्या दृष्टीने विविध विषयांचे गृहपाठ दिले जातात. या वह्यांचेही ओझे असतेच. अशा वह्या शिक्षक व शालेय व्यवस्थापनाने शाळेतच ठेवण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. क्रीडा साहित्य, पिण्याचे फिल्टर्ड पाणी शाळेनेच पुरवावे. या उपायानेही विद्याथ्यार्ंंच्या दप्तराचे ओझे कमी करता येईल.
– ज्ञानेश्वर थोरात, धुळे
9850486435