चिमुकल्यांसोबत जीवघेणा ‘खेळ’; रिमोट कार व्यावसायिकांवर कारवाई

0

शहरात ठिकठिकाणाहून पाच गाड्या जप्त : पोलीस उपअधीक्षकांना केली होती एकाने थेट तक्रार

जळगाव– शहरातील महात्मा गांधी उद्यान, तसेच भाऊंचे उद्यान, या उद्यानांबाहेर काही शुल्क घेवून रिमोट कारमध्ये बसवून चिमुकल्याचे मनोरंजन केले जात असल्याचा प्रकार सुरु होता. मुख्य रस्त्यालगत, रस्त्यावर सुरु असलेल्या या जीवघेण्याखेळाबाबत एका नागरिकाने थेट पोलीस उपअधीक्षकांना तक्रार केली. या तक्रारीची दखल घेवून डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशाने शहरात ठिकठिकाणाहून रिमोटवरील चार कार व एक दुचाकी अशी पाच वाहने शहर वाहतूक शाखेतर्फे शनिवारी कारवाई करुन जमा करण्यात आली आहे.

शहरात बहिणाबाई, भाऊंचे तसेच महात्मा गांधी उद्यान आहे. शहरात वर्दळीच्या ठिकाणी तसेच रस्त्यावर असल्याने या उद्यानांमध्ये पालकांसह चिमुकल्यांची दिवसभर गर्दी होत असते. या गर्दीला अनुसरुन काही तरुणांकडून, नागरिकांकडून उदरनिर्वाहासाठी रिमोट कार, जीप, तसेच दुचाकी आणल्या. त्यात चिमकुल्यांना बसवून ठराविक वेळापर्यंत वाहन चालवून 40 ते 50 रुपये आकारले जात असल्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.

चिमुकला बसलेल्या रिमोटच्या वाहनाला दुचाकीचा धक्का

चिमुकल्याला वाहनात बसविल्यानंतर हातातील रिमोटद्वारे व्यावसायिक हे वाहन रस्त्यात किंवा रस्त्यालगत चालविण्यात येत होत्या. चिमुकला बसलेल्या या रिमोटवरील वाहनाला दुचाकीचा धक्का लागला होता, मात्र दुर्घटना टळली होती. मात्र टळलेली दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून एकाने थेट पोलीस उपअधीक्षकांकडे चिमुकल्यांसोबत उद्यानांच्या बाहेर मुख्य रस्त्यावर तसेच रस्त्यालगत सुरु असलेल्या जीवघेण्या खेळाबाबत तक्रार केली होती.

शहर वाहतूक शाखेने केली रिमोटवरील वाहने जप्त

नागरिकाच्या तक्रारीची दखल घेत पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी शहर वाहतूक शाखेला कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक देवीदास कुनकर यांनी शनिवारी कर्मचार्‍यासह भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान गाठले. सायंकाळी रिमोटवरील चार जीप, एक दुचाकी अशी वाहने जप्त करुन कारवाई करुन शहर वाहतूक शाखेत जमा केली. हे प्रकरण न्यायालयाच्या समोर आणून न्यायालयाच्यास आदेशाने संबधित रिमोटवरील वाहनांच्या मालक व्यावसायिकांवर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे देविदास कुनगर यांनी सांगितले.