चिमुकल्याचा खून केल्याची पोलिसांना शंका

0
चार दिवसानंतरही ओळख नाही पटली
चिंचवड : थेरगाव येथे एका चार ते पाच वर्षीय मुलाचा मृतदेह शुक्रवारी (दि. 7) आढळून आला. त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात मुलाचा खून केला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्यापही त्या मुलाची ओळख पटलेली नसल्याची माहिती वाकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांनी दिली. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन म्हणाले की, त्या मुलाच्या मृत्यू प्रकरणी आम्ही सर्व बाजूंनी तपास करीत आहोत. मुलाची ओळख पटविणे सर्वात महत्वाचे आहे. नरबळीची शक्यंताही आम्ही नाकारत नाही.
शुक्रवारी सायंकाळी एका चार ते पाच वर्षीय मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत थेरगाव येथे आढळून आला. मृतदेहाचे शुक्रवारी शवविच्छेदन केल्यानंतर अहवालामध्ये मुलाच्या डोक्याचत मारण्यात आले असून त्याचा तीन ते चार दिवसांपूर्वी खून करुन त्याला पुरले होते. मात्र प्राण्यांनी किंवा कुत्र्यांनी त्याला वर काढले व हा प्रकार उघडकीस आला. मृत मुलाच्या अंगावर लाल रंगाची पॅन्ट होती. महापालिकेच्या शाळेतील मुलाच्या गणवेशाची या पॅन्टचे साधर्म्य असल्याने त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या शाळेतील एखादा मुलगा गैरहजर असल्यास त्यांच्या घरी जाऊन तो सुखरूप असल्याची खात्री पोलीस करीत आहेत. तसेच राज्यातील सर्व पोलिसांना याबाबत कळविण्यात आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनीही याबाबत माहिती घेतली. परिस्थितीची पाहणी केल्यावर हा प्रकार नरबळीचा नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे, असे वरिष्ठ निरीक्षक माने यांनी सांगितले.