मुलाला पाहताच आई-वडीलांनी मारली मिठी ; बोदवड पोलिसांच्या नाकाबंदीत अडकले होते गुन्हेगार
बोदवड- पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत दोन गुन्हेगार अलगद अडकले होते तर त्यांच्या ताब्यातून सुरतहून अपहरण केलेल्या 11 वर्षीय चिमुकल्याची सुटका करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती. पोलिस चौकशीत आरोपींनी 11 वर्षीय चिमुकल्याला फुस लावून सुरतमधून अपहरण करून आणल्याची कबुली दिल्यानंतर बडोदरा पोलिसांना माहिती कळवण्यात आली. शनिवारी सकाळी बडोदरा पोलिसांनी संशयीत आरोपींना ताब्यात घेतले तर चिमुकल्याला पाहताच आई-वडीलांनी मिठी मारली. दरम्यान, 11 वर्षीय मुलाचा दरबळी देण्यासाठी आणण्यात आले असल्याची चर्चा आहे.
नाकाबंदीत अडकले गुन्हेगार
पोलिस निरीक्षक राजमहेंद्र बाळदकर, सहाय्यक फौजदार विजेश पाटील, हवालदार संजय भोसले, प्रवीण चौधरी, तुषार इंगळे, निखिल नारखेडे, मुकेश पाटील, नीलेश शिसोदे, शशिकांत महाले, मनोज पाटील आदींनी शुक्रवारी रात्री आठ वाजता बोदवड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात नाकाबंदी केल्यानंतर दुचाकी (जीजे 05 जी.एम.243) वरून ट्रीपल सीट जाणार्या तिघांना थांबवून त्यांच्याकडून कागदपत्र व परवान्याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधीत गोंधळल्याने पोलिसांना संशय आला. दुचाकीवरील दोघांनी किरण शाळीग्राम पाटील (20, रा.तालखेडा, ता.मुक्ताईनगर, ह.मु.सुरत) आणि अजय महादेव गवई (18, रा.सलगाव, ता.जळगाव जामोद, ह.मु. सुरत) अशी नावे सांगितली तर त्यांच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाला विचारणा केल्यानंतर त्याने यश विलास खराटे (वय 11, रा.सुरत) नाव असल्याचे सांगून दोघा संशयीतांनी फूस लावून पळवून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी लागलीच दोघा आरोपींना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले तसेच बडोदरा पोलिसांना माहिती देण्यात आली.
नरबळी वा खंडणीसाठी चिमुकल्याच्या अपहरणाची शक्यता
दरम्यान, अटकेतील दोघा आरोपींनी चिमुकल्या यशची खंडणी वा नरबळीसाठी अपहरण केल्याची शक्यता आहे मात्र हा गुन्हा बडोदरा पोलिसांकडे दाखल असल्याचे त्याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. शनिवारी सकाळी बडोदा पोलिसांनी दोघा आरोपींचा ताबा घेतला.