चिमुकल्या वारकर्‍यांच्या वेशभूषेने वेधले लक्ष

0

श्री एकनाथराव खडसे टॅलेंट इंग्लिश मीडियम स्कुलचा दिंडी सोहळा

मुक्ताईनगर- आषाढी एकादशीचे औचित्य साधून शहरातील श्री एकनाथराव खडसे टॅलेंट स्कूलमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकर्‍यांसह श्री विठ्ठलाची वेशभूषा साकारत दिंडी काढली. शहरवासीयांने चिमुकल्यांच्या वेशभूषेचे कौतुक केले. दिंडीची सुरुवात परीवर्तन चौकानजीकच्या गायत्री मंदीरात गायत्री मातेच्या आरतीने करण्यात आली. मंदिर समिती सदस्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्प सुमनांनी केले. प्रातिनिधीक स्वागत प्राचार्य अनिल पाटील यांचे करण्यात आले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष नजमा इरफान तडवी यांनी प्राचार्य तथा सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले. दिंडी थेट मुक्ताईनगर मंदिर परीसरात पोहोचली. तेथे विठू माऊलीसहित सर्व दर्शन करून झाल्यावर दिंडीचे विद्यार्थी शाळेत आले. दिंडीस माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे आणि खासदार रक्षा खडसे यांनी शुभेच्छा दिल्या. या दिंडीतून प्लास्टिक वापर टाळणे, गुटखा व व्यसनांचा निषेध, उघड्यावर शौच बंद करा, परीसर स्वच्छता, ‘बेटी बचाव, झाडे लावा झाडे जगवा’ असे समाजाभिमुख संदेश देण्यात आले. दिंडीस प्राचार्य अनिल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग दिंडीत सहभागी झाले.