नवी दिल्ली । गेल्या कित्येक दिवसांपासून बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. कधी पुराव्यामुळे आरोपीला शिक्षा होते तर पुराव्याअभावी नराधम सुटून जातो. मात्र दिल्लीतील एक घटना या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. पीडित मुलीने घडलेला प्रसंग व्यक्त करता येत नसल्यामुळे चित्र काढून घटना व्यक्त केली आणि त्या घटनेतील सत्यता जगासमोर, न्यायालयासमोर मांडली आहे. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेत सबळ पुरावे नसल्यामुळे आरोपीला अटक करणे शक्य नव्हते. मात्र, मुलीने काढलेले रेखाचित्र पुरावा म्हणून ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपीला 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पण हा प्रवास सरळ नव्हता. 10 वर्षांची मुलगी घडलेला प्रकार व्यक्त करू शकत नसल्यामुळे नराधम सुटला होता. पण 2 वर्षानंतर तिने काढलेलं चित्र बोलले आणि नराधमाचा चेहरा जगासमोर आला आणि आरोपीला 5 वर्षांची शिक्षा झाली. पीडित 10 वर्षीय चिमुकली मूळची कोलकाताची राहणारी आहे. जन्मानंतरच आईचे निधन झाले, तर वडील दारुडे असल्याने तिची काळजी घेण्यासाठी कोणीच नव्हते. अशावेळी तिच्या काकीने तिला आपल्यासोबत दिल्लीला आणले होते. त्यावेळी ती 8 वर्षांची होती. तिचा सख्खा काका अख्तर अहमद याने या चिमुकल्या मुलीवर अनेकदा अतिप्रसंग केला. याप्रकरणी गेल्या वर्षी 4 जून रोजी त्याला अटकही करण्यात आली होती. मात्र, पुराव्यांअभावी त्याची सुटका झाली होती.
पहिल्यादा मानले चित्राला सबळ पुरावा
मुलीने रेखाटलेल्या एका चित्रावरून या प्रकरणाला वळण मिळाले आणि नराधम काकाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, मुलीने तिच्याकडील क्रेयॉन रंगांनी एक चित्र काढले. चित्रात तिने स्वत:च्या हातात फुगे दाखवले, तर तिचे कपडे जमिनीवर पडल्याचे तिने रेखाटले. याची दखल घेत न्यायाधीशांना नराधम काकाला दोषी ठरवले. भारतीय न्यायव्यवस्थेत दिला गेलेला हा अत्यंत दुर्मिळ समजला जात आहे. पीडित व्यक्तीने रेखाटलेल्या चित्रावरून आरोपीला शिक्षा होण्याची भारतातली ही पहिलीच वेळ आहे.
कारावास, आर्थिक दंड
अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनोद यादव यांनी हे चित्रच तिची साक्ष मानली. निकाल देताना ते म्हणाले की, जर हे चित्र तथ्य आणि पार्श्वभूमी मानली, तर असे समजते की, तिचे कपडे काढून लैंगिक शोषण झाले आहे. या घटनेचा परिणाम तिच्या मनावर झाला आहे, जो पुरावा म्हणून सादर झाला. हे चित्र त्या घटनेच्या व्याख्येसाठी पुरेसे आहे. मी पीडितेला सक्षम साक्षीदार समजतो, असे न्यायाधीश म्हणाले. दरम्यान, न्यायालयाने दोषी अख्तर अहमदला पाच वर्षांच्या शिक्षेसह 10 हजारांचा दंडही ठोठावला आहे. याशिवाय पीडित मुलीला नुकसानभरपाई म्हणून तीन लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटच्या स्वरूपात देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.