चिमुरड्यांना अमानुष मारहाण; सावत्र आईसह बापावर गुन्हा

0

लोखंडी सळईने देत होते चटके

टपपरी-चिंचवड :  घरातली कामे येत नाहीत. तसेच काम स्वच्छ करीत नाहीत. या कारणावरून सावत्र आईने दोन चिमुरड्यांना अमानुषपणे मारहाण केली. त्याला वडिलांनी देखील साथ दिली. सावत्र आईने लोखंडी सळईने चटके देत त्या दोन निरागस जीवांना उपाशी देखील ठेवले. या त्रासाला कंटाळून घर सोडून गावाला निघालेल्या दोन चिमुरड्यांना सजग नागरिकांच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

काठीने मारहाण, दोन-दोन दिवस उपाशी

भोसरी पोलिसांनी सावत्र आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उमेश आणि श्रुती (नावे बदलली आहेत) दोघेही मोशी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आईचे मानसिक संतुलन बिघडले. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी दोन वर्षापूर्वी दुसरे लग्न केले. लग्नानंतर उमेश आणि श्रुती यांच्याशी त्यांची सावत्र आई तुसडेपणाने वागत असे. मागील सहा महिन्यांपासून तर त्या दोन लहानग्यांचा त्रास वाढतच गेला. घरातील धुणी भांडी करणे, फरशी पुसणे, स्वयंपाक करणे अशी कामे त्या दोन बहीण भावांकडून सावत्र आई करून घ्यायची. कामांमध्ये काही चुका झाल्यास किंवा कामाला उशीर झाल्यास त्यांना कधी काठीने तर कधी गरम सळईने मारहाण व्हायची. आरोपी एवढ्यावरच न थांबता दोन्ही मुलांना वेळोवेळी जेवण देखील देत नव्हते.

असह्य त्रास; चिमुकल्यांचा पायी प्रवास

हा त्रास दोघांना नित्याचाच पण असह्य झाला होता. त्यामुळे दोघांनी आपल्या सख्या आईकडे लातूर येथे जाण्याचा निर्णय घेतला. मोशीपासून ते चालत भोसरी पर्यंत आले. तेथून लातूर येथे जाण्यासाठी कोणते वाहन मिळेल, याबाबत नागरिकांकडे चौकशी करीत होते. ही बाब एका नागरिकाने पोलिसांना सांगितली. त्यानुसार भोसरी पोलिसांनी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या यातना पोलिसांना सांगितल्या. मुलांनी जेंव्हा त्यांच्या अंगावरील जखमांचे व्रण पोलिसांना दाखवले, त्यावेळी वर्दीतील माणूस सुद्धा रडला. दोन्ही मुलांची पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर सावत्र आई आणि वडिलांवर गुन्हा दाखल केला.