चिमुरड्याला पैलवान होण्यासाठी आणले आणि केला लैंगिक अत्याचार

0

कोल्हापूर : पैलवान होण्यासाठी आलेल्या चिमुरड्यावर अमानुष अत्याचार करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सात वर्षांचा शालेय विद्यार्थी पैलवान होण्याचे स्वप्न उराशी बाळगून उस्मानाबादहून कोल्हापूरला आला होता.

दोघा भावांनी सात वर्षांच्या चिमुरड्याचा अमानुष छळ करुन त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याच्या गुप्तांगाला चटके देणे, बेदम मारहाण करणे असे अत्याचार त्यांनी केल्याचा दावा केला जात आहे. हे दोन्ही आरोपी अद्याप फरार असून जुना राजवाडा पोलिस स्टेशनमधे गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलगा दीड महिन्यापूर्वी पैलवान होण्यासाठी या दोघा भावांसोबत उस्मानाबादहून कोल्हापूरला आला होता. तालमीशेजारील दगडी चाळमध्ये तिघेजण खोली घेऊन राहत होते. या काळात पीडित मुलगा दोन-चार वेळाच तालमीत गेला, त्यानंतर तो गेलाच नसल्याचे समोर आले आहे.

या दोघा भावांनी त्याला भांडी घासायला लावणे, झाडलोट करणे अशी कामं करायला लावली. प्रसंगी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचारही केल्याचा आरोप आहे. त्याला विरोध केल्यास बेदम मारहाण करत गुप्तांगाला चटकेही दिले. त्याच्या आई-वडीलांचे फोनही त्याला दिले जात नव्हते.

प्रकरण कसे आले उघडकीस?
जीवे मारण्याची धमकी देऊन, बंद खोलीत डांबून त्याच्यावर महिनाभर अत्याचार सुरु होता. त्याची प्रकृती जास्तच गंभीर झाल्यानंतर या दोघा भावांनी त्याला मंगळवारी रोजी सीपीआरमध्ये दाखल केले. त्याच्या आई-वडीलांना याची कल्पनाही दिली नव्हती. हा प्रकार गंभीर असल्याने सीपीआरच्या डॉक्टरांनी धीर देत त्याच्या आई-वडीलांचा फोन नंबर मिळवला. पालकांशी संपर्क साधून तात्काळ कोल्हापूरला येण्यास सांगितलं. गुरुवारी आई-वडिलांनी सीपीआरमध्ये येऊन मुलाची प्रकृती पाहली असता त्यांना मानसिक धक्काच बसला. त्यानंतर पालकांनी जुना राजवाडा पोलिस स्टेशनमधे गुन्हा दाखल केला. हल्ली अत्याचारांचे प्रमाण एवढे वाढले आहे की सरकारने सुरक्षेसाठी कितीही उपाययोजना केली तरी मुली शहरात अद्यापही असुरक्षीतच आहेत. पण मुलींबरोबरच आता मुलंही फार सुरक्षित नसल्याचे अनेक घटनांवरुन समोेर आले आहे.