उरण । अनेक दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने शनिवारी रायगड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे उरण तालुक्यातील चिरनेरसारख्या डोगर कुशीला वसलेल्या गावातील सुमारे शंभर सव्वाशे घरांना याचा फटका बसला आहे. मात्र, ही आपत्ती पूर्णतः मानवनिर्मित असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. चिरनेर परिसरातून मोठ्या प्रमाणात झालेल्या माती दगड उत्खननामुळे या ठिकाणी डोंगर माथ्यावर पाणी जिरवण्याची प्रक्रियाच पूर्णतः बंद झाली आहे तर बेसुमार उत्खननामुळे पाण्याचे प्रवाहच मोठ्या प्रमाणात बदलेले गेल्याने सर्वच डोंगरमाथ्यावरचे पाणी गावातील नाल्यातून गेल्याने हा हाहाकार उडाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. त्यामुळे डोंगर माथ्यावर खाजगी आणि वनखात्याच्या जमिनीमध्ये चोराटी पद्धतीने होणार्या बेसुमार उत्खनन करणार्यावर जिल्हा महसूल प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मातीचे बेसुमार उत्खनन कारणीभूत
जे एन पी टी चे चौथे बंदर आणि साडेबारा टक्केच्या भरावासाठी याच भागातून मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन केले जात असून चिरनेरमधील पूरस्थिती हा त्याचाच परिपाक असल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे. या संपूर्ण भागात होणार्या अपिरिमित उत्खननामुळे या भागात पावसाळ्यात महामुबईची महातुंबई होण्याचा धोका अनेक वृत्तपत्रांनी मे महिन्यातच व्यक्त केला होता. मात्र वृत्तपत्रातील बातम्यांना फारशी किंमत न देणार्या जिल्हा आणि तालुका प्रशासनाच्या डोक्यात मात्र चिरनेरच्या हाहाकारानंतर तरी लख्ख प्रकाश पडो अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. या सर्व प्रकारामुळे चिरनेरचे ही माळीण झाले असते तर त्यात आशचर्य नव्हते असेही अनेकांचे म्हणणे आहे.
सर्वसामान्यांना पुराचा फटका
चिरनेर गावात जे काही पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले त्यात मोठ्या प्रमाणात मातीमिश्रीत पाणी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरात झालेले बेसुमार उत्खनन हेच नागरिकांच्या जीवावर बेतले होते. मात्र नागरिकांचे नशीब बलवत्तर म्हणून या घटनेत कोणतीही मनुष्य हानी झालेली नाही. मात्र चिरनेर गावातील सुमारे 100 ते सव्वाशे घरांत हे पुराचे पाणी शिरल्याची घटना घडली असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे. 1972 नंतर आता पुन्हा या पद्धतीचे पुराचे रौद्ररूप नागरिकांना अनुभवायला मिळाले आहे, डोंगरमाथ्यावरून पाणी कुठे न जिरता ते थेट नागरिकांच्या घरात शिरले असल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. त्यामुळे या हाहाकाराला परिसरात मोठ्या प्रमाणात झालेले माती उत्खननच कारणीभूत असल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे. त्यामुळे ज्यांच्या खाजगी जमिनीमध्ये अशा प्रकारचे उत्खनन झाले आहे, अशाना फायदा झाला असला तरीही सर्व सामान्यांना मात्र नाहक आर्थिक फटका बसला असल्याचे या ठिकाणी समोर आले आहे.
उत्खनन होताना महसूल खात्याचे डोळे बंद
महिन्याभराच्या विश्रांतीनंतर शनिवारी पहाटेपासूनच उरण परिसरात पुन्हा पावसाने जोरदार सुरुवात केली. ज्यामध्ये चिरनेरने मोठ्या प्रमाणात महापूर अनुभवल्याचे समोर आले आहे. त्यातच पाणी ओसरण्याच्या मार्गावरदेखील अनेक ठिकाणी झालेली अतिक्रमणे ही पुराचे पाणी नाल्यालगत असलेल्या चिरनेरवासीयांच्या घराघरांत घुसण्याला कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. चिरनेरच्या या पूरग्रस्त परिस्थितीला ग्रामपंचायत, आपल्या खाजगी जागेतून माती उत्खनन करणारे नागरिक, मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असताना डोळ्यांवर पट्टी बांधून राहिलेले महसूलखाते आणि इतर शासकीय यंत्रणाच अधिक जबाबदार असल्याचा आरोप या निमित्ताने केला जात आहे.