उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव
तळेगाव दाभाडे : पेट्रोकेमिकल क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील दोन वैज्ञानिकांना एकत्रित ‘नॅशनल इनोव्हेशन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मद्रास येथे गुरुवारी (दि. 24) होणार आहे. भारताचे उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तळेगावमधील चिराग मधुसूदन खळदे आणि बुलढाणा येथील प्रा. जितेंद्र सांगावे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीयस्तरावरील या पुरस्काराचे यंदा आठवे वर्ष आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, सांख्यिकी एवं कार्यक्रम कार्यान्वयन तथा रसायन एवं उर्वरक मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री डी.वी.सदानंद गौडा, खासदार डॉ.जे.जयवर्धन, आमदार सुब्रमणियन आदी उपस्थित राहणार आहेत.
हे देखील वाचा
खळदे यांचे संरक्षण विभागात महत्वाचे योगदान
चिराग खळदे यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण तळेगाव येथे झाले. अॅरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी आयआयटी मद्रास येथून घेतली. त्यानंतर तिथूनच त्यांनी ओसीयन अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. सध्या ते पेट्रोलियम इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी करीत आहेत. दरम्यान, त्यांनी इंग्लंड येथे केमिकल सायंटिस्ट, तसेच नेदरलँड येथे मेटॅलर्जीवर काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी मलेशिया, सिंगापूर, जर्मनी, फ्रांस, नेदरलँड, बेल्जीयम आदी देशांमध्ये विविध वैज्ञानिक विषयांवर व्याख्यान दिले आहे. त्याचबरोबर संरक्षण विभागातही त्यांचे महत्वाचे योगदान आहे. आजवर त्यांनी पाच पेटंट स्वतःच्या नावावर करून घेतले आहेत. त्यातील दोन पेटंटसाठी अमेरिकेने ‘इंटेलेक्च्युअल व्हेंचर’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. तर तिसर्या पेटंटसाठी भारत सरकार त्यांचा ‘नॅशनल इनोव्हेशन अवॉर्ड’ देऊन गौरव करीत आहेत. पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या डिव्हाईसचे त्यांनी पेटंट घेतले असून या डिव्हाईसच्या वापरामुळे औषधनिर्मिती, पेट्रोलियम आणि रसायन क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहेत. काही गोष्टींच्या किमती देखील यामुळे कमी होण्यासाठी मदत होणार आहे. त्यांच्या सोबत बुलढाणा येथील प्रा. जितेंद्र सांगावे यांचा देखील गौरव होणार आहे. प्रा. सांगावे आयआयटी मद्रास येथे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत.