चिलटांनी पुणेकर हैराण

0

पुणे । शहरभर पसरलेल्या चिलटांनी पुणेकर हैराण झाले असून, चिलटांच्या थवेच्या थवे अक्षरश: वाहनचालक आणि पादचार्‍यांवर येऊन धडकत आहेत. ते डोळे, नाक, तोंडात जात असल्याने वाहनचालक त्रासले आहेत. चिलट डोळ्यांत गेल्यास वाहनांवरचा ताबा सुटून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शहरात थंडी वाढू लागली आहे. त्यामुळे हे हवामान चिलटांच्या प्रजननासाठी योग्य असल्याने त्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. गेल्या दोन दिवसांपासून शहरात या चिलटांचा प्रादुर्भाव खूप वाढलेला असून, दोन-तीन वाजल्यापासून ते दिवस मावळेपर्यंत चिलटांचे थवेच्या थवे अंगावर येऊन धडकत आहेत. तसेच हातावर, चेहर्‍यावर, मानेवर, कपड्यांमध्ये ते जातात आणि चावतात त्यामुळे खाजवण्याचा मोह झाल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवणे अवघड झाले आहे. पायी चालणार्‍यांनाही त्याचा खूप त्रास होत असून, नाकावर, तोंडावर रुमाल ठेवून, हाताने चिलटांना हुसकावण्याचा उद्योगच पायी चालणार्‍यांच्या मागे लागला होता. वाहनचालकांना सक्तीने गॉगल घालणे आणि तोंडाला रुमाल बांधण्याशिवाय पर्यायच उरला नाही. चिलट्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्यांचा अधिवास असलेल्या ठिकाणी म्हणजे झाडां-झुडुपांमध्ये ठराविक रसायनांची धूरफवारणी करणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेकडे अद्याप याबाबत उपाययोजना करणारी यंत्रणाच आणि औषधेच नाहीत. धूरफवारणीला कायद्याने बंदी आहे. त्यामुळे या चिलटांचा कसा बंदोबस्त करावा याबाबत पालिकेपुढे आव्हान निर्माण झाले आहे.