चिली विरुद्ध जर्मनीलाच विजयाची पसंती

0

सेंट पीटर्सबग । कॉन्फेडरेशन चषक स्पर्धेतील रविवारी होणार्‍या अंतिम सामन्यात अनुभवी चिली समोर नव्या दम्याच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या जर्मनीचे आव्हान असणार आहे. जर्मनीच्या युवा खेळाडूंनी या स्पर्धेत केलेला झंझावती खेळ पाहता अंतिम सामन्याआधीच त्यांनी ही स्पर्धा जिंकली असल्याचे बोलले जात आहे. चिलीच्या संघात अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांचा पूर्व इतिहास पाहता त्याच्याकडून तुल्यबळ लढतीची अपेक्षा असल्यामुळे फुटबॉलप्रेमींना रंगतदार लढतीची मेजवानी मिळण्याची शक्यता आहे.

युवा खेळाडूंचा संघ
केवळ आठ संघांचा समावेश असलेल्या या कॉन्फेडरेशन चषक स्पर्धेबाबत जर्मनीचे कोच जोकिम लोए यांचे फारसे चांगले मत नाही आहे. ते या स्पर्धेकडे पुढील वर्षी होणार्‍या विश्‍वचषक स्पर्धेच्या रंगीत तालमीच्या दृष्टीने बघत आहेत. त्यामुळेच संघातील बड्या खेळाडूंना सुटी देऊन युवा खेळाडूंना घेऊन ते रशियाला आले आहेत. मॅट हुमेल्स, जर्मी बोटेंम, टोनी क्रूस, सामी खेडीरा, मॅन्युएल नेउर आणि मार्को रेउर या अनुभवी खेळाडूंशिवाय जर्मनीचा संघ स्पर्धेत खेळला.

संधी साधली नाही
चिलीच्या संघाला अ‍ॅलेक्स सांचेझकडून चांगल्या खेळाची आशा असेल. अ‍ॅलेक्सने आतापर्यंत चांगला खेळ केला असला तरी फार कमी वेळा त्याने मिळालेल्या संधीचे गोलात रूपांतर केले आहे. युरो विजेत्या पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यात अनेकदा संधी मिळूनही चिलीच्या आघाडीच्या खेळाडूंना त्याचा फायदा उचलता आला नव्हता.