नवी दिल्ली : सिक्कीम भागातील डोकलाममध्ये भारत व चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकलेले असताना, भारतासोबत युद्ध करण्यासाठी चीनची पुरेपूर तयारी सुरु असल्याची माहिती उघड झाली आहे. चीनने तिबेट सीमेनजीक मोठ्या प्रमाणात दारुगोळा व शस्त्रसामग्री जमविली असल्याचेही लष्करी सूत्राने सांगितले. सिक्कीमपासून सुमारे 700 किलोमीटर अंतरावर ही युद्धतयारी सुरु आहे. चीनने नुकताच तिबेटमध्ये युद्धसराव केला. यानिमित्ताने हजारो टन युद्धसामग्री चीनने तिबेटसीमेवर हलविली आहे. त्यात विध्वंसक सामग्रीचाही समावेश आहे. दरम्यान, माजी संरक्षणमंत्री मुलायमसिंह यादव यांनी पाकिस्तानपेक्षा चीनकडून भारताला धोका जास्त असून, चीन युद्धाची तयारी करत असताना, केंद्र सरकार या युद्धासाठी तयार आहे का? असा सवाल संसदेत केला. सरकारने चीन सीमेवरील तणावप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही यादव म्हणाले.
चीनचा युद्धसराव युद्धाचीच तयारी!
चिनी लष्कराच्या साउथ चायना मॉर्निंग पोस्ट या दैनिकाच्या वृत्तानुसार, चीनने मोठ्या प्रमाणात पश्चिमी कमांडद्वारे उत्तर तिबेटमधील कुनकुन पर्वतीय भागात युद्धसामग्री पाठवलेली आहे. हा भाग तिबेट आणि शिनजियांग परिसरासह भारताच्या सीमाभागाला अगदी खेटून आहे. मागील महिन्यापासूनच चीनने भारतासोबत युद्धाची तयारी चालवलेली असून, लष्करी सामग्री रस्तामार्गासह रेल्वेद्वारेही या भागात पाठवली जात आहे. भारतासोबत युद्धाची वेळ आली तर सैन्य सज्ज असावे म्हणून चीनने तिबेटमध्ये युद्धसरावही केला होता. तातडीची लष्करी कारवाई, डिजिटल उपकरणांचा युद्धात वापर तसेच शत्रूवर संयुक्त व पृथक हल्ले याबाबत सैन्याचा सराव घेत चीनने भारताला सूचक इशाराही यानिमित्ताने दिला आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)चे जवान बंकर तसेच होवित्झरला उडविण्यासाठी टँकविरोधी ग्रेनेड व क्षेपणास्त्रांचा वापरही या सरावात झाला असल्याचे व्हिडिओ भारतीय लष्कराच्या हाती आले आहेत. चीनच्या तिबेट भागात भारताची मोठी सीमा असून, सिक्कीममधील डोकलाम येथे गेल्या महिनाभरापासून भारत व चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहे. दुसरीकडे, भूतानसोबतही चीनचा तणाव निर्माण झालेला आहे.
चीनने पाकमध्ये अण्वस्त्रे पाठवली : मुलायमसिंह
लोकसभेत चीनसोबतच्या तणावावरुन समाजवादी पक्षाचे खासदार आणि माजी संरक्षणमंत्री मुलायमसिंह यादव यांनी संसदेत भाष्य केले. सिक्कीम आणि भूतानवर कब्जा करण्याचा चीनचा डाव आहे. भारतावर हल्ला करण्याची त्यांची तयारी झाली आहे. भारताला पाकिस्तानपेक्षा जास्त धोका चीनपासून असून, भारताविरोधात ते पाकिस्तानची मदत घेत आहेत, असे मुलायमसिंह यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये चीनने अण्वस्त्रे पाठवली आहेत असा दावाही त्यांनी केला. चीनसंदर्भात वारंवार मुद्दा उपस्थित करुनही केंद्र सरकार ठोस भूमिका मांडत नाही. चीनविरोधात सरकारने काय पावले उचलली हे सरकार का जाहीर करत नाही, असा सवाल त्यांनी विचारला. लोकसभेत मुलायमसिंह मुद्दा मांडत असताना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी त्यांना संक्षिप्त स्वरुपात तुमचे म्हणणे मांडा अशा सुचना वारंवार केल्या. पण मुलायमसिंह यांनी त्यांचे बोलणे सुरुच ठेवले.