चीनचा थयथयाट

0

अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून बराक ओबामा पायउतार झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. खरे तर अमेरिकन भारतीयांसह देशातील नागरिकांच्याही मनात ट्रम्प यांच्याविषयी शंका होती. त्यांची ध्येयधोरणे आणि एकूणच स्वभावामुळे भारतासोबत त्यांचे संबंध कसे असणार? याविषयी अस्वस्थ वातावरण होते. अमेरिकेत काम करणार्‍या भारतीयांना मिळणार्‍या एच वन बी व्हिसासंबंधीही चिंता व्यक्त होत होती. अशा संदिग्ध वातावरणामुळे चीनच्या मनात हर्ष असतानाच; मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला आणि सर्व वातावरणच पालटले. मन की बातने समस्त भारतीयांवर जादू करणार्‍या या नेत्याने लीलया ट्रम्प यांनाही गुंडाळले. तीन-तीन वेळा ट्रम्प महाशयांनी मोदींची गळाभेट घेतली. दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करारही झाले. अणुऊर्जासंबंधीही चर्चा झाली. अमेरिकेत हे सर्व सुरू असताना चीनची पोटदुखी आणि रक्तदाब मात्र, वाढला होता. अगदी असह्य झाल्यानंतर चीनने, भारताची अमेरिकेशी असलेली जवळीक ही भविष्यात घातक ठरेल, अशी कुत्सित भविष्यवाणीही वर्तवली. तेव्हापासून या अवाढव्य राष्ट्राचा जळफळाट सुरू झाला तो अजूनही सुरूच आहे. त्यातच अमेरिकेने रसद बंद करत पाकिस्तानला दहाशतवाद संपवण्यास सांगून पाकला दिलेल्या झटक्याची झळ चीनला लागली. यामुळे अस्वस्थ चीनने सिक्कीम, डोकलाममध्ये कुरापतींना सुरुवात केली. आतातर ते युद्धाची भाषा करत आहेत. मुळातच भारत-अमेरिकेची जवळीक हेच चीनच्या पोटदुखीचे मुख्य कारण आहे. या पोटदुखीतूनच भारताविरुद्ध रान पेटवण्याचे धोरण अंगीकारलेल्या ग्लोबल टाइम्सने भारताला युद्धाची धमकीच दिली आहे. चीनचे हे मुखपत्र आता जास्तच थयथयाट करत आहे. पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या भारत-पाक युद्धाच्या पाठीमागे अमेरिका आणि सोव्हिएत संघाची अदृश भूमिका होती. भारताने हा भूतकाळ विसरू नये. चीन जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून भारताचा शेजारीही आहे. युद्ध झाल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, अशा वल्गना हे मुखपत्र करत आहे.

युद्ध करणार्‍या प्रत्येक देशाला आर्थिक फटका हा बसतोच. त्याच्या भविष्यातील परिणामानांही सामोरे जावे लागते. मग, तो देश आर्थिक महासत्ता असो की, नसो. भारतचीन युद्ध झालेच तर केवळ भारतच नव्हे, तर चीनलाही त्याचा मोठा फटका बसणारच आहे. चीनलाही ते परवडणारे नाही. परंतु, उगाचच उसने अवसान आणून भारताला धमकावण्याचे उद्योग हे राष्ट्र करत आहे. जगभरात भारताची वाढत असलेली ताकद चीनला असह्य होत आहे. यातूनच त्यांच्या कुरापती वाढल्यात. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने चीन पाकिस्तानला पुढे करत असला तरी सर्वच शेजारी राष्ट्रांशी चीन आणि पाक दोघांचेही वाजलेले आहे. श्रीलंकेनेही चीनला जोरदार धक्का दिला आहे. श्रीलंकेला जवळ करून भारताला डिवचण्याचा चीनचा प्रयत्नही फोल ठरला आहे. हंबनटोटा बंदर विकसित करण्यासाठी श्रीलंकेने चीनशी करार केला होता. परंतु, या चिमुकल्या राष्ट्राच्या नागरिकांनी केलेल्या उठावामुळे श्रीलंकन सरकारला या करारात नुकताच बदल करावा लागला. त्यामुळे श्रीलंकेडून भारताची कोंडी करण्याचा चीनचा प्रयत्न वाया गेला. श्रीलंकेतील या बंदरातून भारताला शह देण्याचा चीनचा कट फसला आहे. आता भारताने आपले परराष्ट्रधोरण पणाला लावून भूतानला आपली भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडले पाहिजे. कारण भारताने भूतानला नेहमीच मैत्रीचा हात पुढे करत सहकार्य केले आहे. सध्या डोकलाम आणि सिक्कीममध्ये चीन-भारत आमनेसामने असताना त्याच सीमेवरील भूतान मात्र शांत आहे. हे भारतासाठी थोडे चिंतेचे आहे. परंतु, ज्यापद्धतीने भारताने सध्या यशस्वी परराष्ट्रधोरण राबवले आहे, ते पाहता यातूनही भारत मार्ग काढेल, यात शंका नाही. भारत आणि भूतानमध्ये 699 किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. आसाममध्ये 267 किलोमीटरचा भूभाग चीनच्या सीमेला खेटून आहे. या दोन बलाढ्य राष्ट्रांच्या युद्धशक्यतेची झळ भूतानला बसतच आहे. परंतु, प्रत्यक्ष युद्ध झाल्यास त्याचाही मोठा फटका बसेल. डोकलामधील तणावाला अजित डोवाल जबाबदार आहेत, असा कांगावा ग्लोबल टाइम्स करत आहे. ब्रिक्स परिषदेच्या तयारीसाठी ब्रिक्स राष्ट्रांच्या सुरक्षा सल्लागारांची बैठक होणार असून, यावेळी अजित डोवाल भारत-चीनमधील तणावावर मार्ग काढतील, अशी चर्चा सुरू असतानाच ग्लोबल टाइम्सने डोवाल यांनाच लक्ष्य करणे आणि त्यामागील तर्क काय, हे समजून घ्यावे लागणार आहे तसेच वू किआन यांची धमकीही नवी दिल्लीने गांभीर्याने घेऊन पुढील रणनीती ठरवली पाहिजे. चीन हे शत्रूराष्ट्र असले तरी ते प्रबळ आहे, हे विसरून चालणार नाही. सावधानता कधीही चांगलीच. सीमा रेषेवरून योग्य तो इशारा भारताने दिलाच आहे. म्हणूनच त्यांचा जळफळाट झाला आहे. युद्धासाठी धमकावल्यानंतरही भारत सैन्य मागे घेण्यास तयार नसल्यानेच चीनने धमक्या देण्याचे सत्रच सुरू केले. मात्र, आशा परिस्थितीत भारताने किती दारूगोळा शिल्लक आहे, यावर जाहीर चर्चा बंद करून आपल्या मुत्सद्देगिरीचे कायम दर्शन घडवणे अपेक्षित आहे. भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती असतानाच कॅगने दारूगोळ्यासंबंधी चिंता व्यक्त केली. ती सार्वजनिक झाल्याने त्याचे काही विपरीत परिणाम होऊ शकतात.