नवी दिल्ली । चीन आणि भारत यांच्या सीमेदरम्यान सुरू असलेल्या वादावर चीनमधील माध्यमांनी आता नवीन कांगावा सुरू केला आहे. भारतात वाढीस लागलेला हिंदू राष्ट्रवाद हे भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश्य स्थिती निर्मात होण्यास कारणीभूत आहे, त्यामुळे भारतात वाढत असलेल्या हिंदु राष्ट्रवादावर नियंत्रण मिळवून भारत-चीन दरम्यान तणावाग्रस्त वातावरण निवळवले पाहिजे, असे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये स्तंभलेखक यू यिंग यांनी त्यांच्या लेखामध्ये म्हटले आहे.
हिंदू राष्ट्रवादामुळे भारतात मुस्लिम असुरक्षित
या लेखात पुढे असेही म्हटले आहे की, वर्ष 2014मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले. तेव्हापासून भारतात हिंदू राष्ट्रवादाच्या भावना वाढत गेल्या. या भावना वाढवल्यानंतर मोदी सरकार त्यावर नियंत्रण मिळवू शकले नाही. त्याचा परिणाम म्हणून वर्ष 2014 नंतर भारतातील मुस्लिमांच्या विरोधात हिंसा वाढत गेली, मोदी सत्तास्थानी बसावेत म्हणून हिंदू राष्ट्रवादाचा वापर करण्यात आला. हिंदू राष्ट्रवादी भावना बाळगणारा लोक समुह हा चीनचा विरोधक आहे, म्हणून सध्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे.
चीनविरोधी भूमिकेसाठी दबाव
एका बाजूला भारतात या भावना वाढत आहेत आणि दुसरीकडे प्रतिगामी विचारांचे आक्रमण होऊ लागले आहे. त्याचाच परिणाम म्हणून भारत आणि चीन या देशांप्रति कुटनीती अवलंबण्यासाठी दिल्लीवर दबाव येत असल्याचे या लेखामध्ये म्हटले आहे. चीन वारंवार भारताला सांगत आहे की, त्यांनी त्यांचे सैनिक त्वरित मागे घ्यावेत, असे सांगूनही भारत सरकारने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे.
भारत चीनच्या तुलनेत कमजोर
भारत आणि चीन हे दोघे ताकदीच्या जोरावर एकमेकांना आव्हान देत आहेत, मात्र तुलनेत भारत चीनपेक्षा कमजोर आहे. भारतातील राष्ट्रवादाच्या भूमिकेतून चीनकडे पाहण्याच्या दृष्टीकोन जो बदलला आहे, त्यातून काहीही चांगले निष्पन्न होणार नाही. यातून भारत त्यांचे हित गमावून बसणार आहे, असा इशाराही या लेखामध्ये देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्या दरम्यान तणाव निर्माण झाला आहे. सिक्किमजवळील डोकलाम येथील सीमेवर दोन्ही देशांमध्ये तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले असून हे दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एका बाजूला चीन वारंवार भारताला त्यांचे सैन्य सीमेवरून हटवण्यास सांगत आहे, तसेच त्यांच्या वृत्तपत्रांतून भारतासोबत कोणत्याही स्तरावर संघर्ष करण्यास चीन तयार आहे, अशी चिथावणीही देत आहे. भारतावर दबाव टाकून, युद्धाच्या धमक्या देत चीन संपूर्ण जगाला संदेश देत आहे. साम्राज्य वादाने झपाटलेल्या चीनला आवरणे हे जगासमोरचे मोठे आव्हान बनले आहे.