चीनचा बॉक्सर जुल्पिकारची विजेंदर सोबतच्या लढतीतून माघार

0

मुंबई – भारताचा स्टार मुष्टियोद्धा विजेंदर सिंगचा नियोजित लढतीचा प्रतिस्पर्धी चीनच्या झुल्पिकार मैमैतियालीने माघार घेतल्याने आता लढतीच्या आयोजकांना नव्या प्रतिस्पर्ध्याचा शोध घ्यावा लागणार आहे. झुल्पिकारने माघार घेण्याचे निश्चित कारण सांगितलेले नाही. मात्र 1 एप्रिल रोजी होणारी ही लढत ठरल्याप्रमाणे मुंबईत होणार आहे. विजेंदर-झुल्पिकार यांच्यातील सुपर मिडलवेट गटाची ही लढत डबल आशियाई किताबासाठी होणार होती. विजेंदरने डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिकचा किताब मिळविलेला आहे तर झुल्पिकारने डब्ल्यूबीओ ओरिएन्टल किताब जिंकला असून हे दोन्ही किताब या लढतीत पणाला लागले होते.

प्रतिस्पर्ध्याचा शोध घेण्यास सुरुवात
विजेंदरचे प्रवर्तक आयओएस बॉक्सिंग प्रमोशन्स यांनी सांगितले की, झुल्पिकरने माघारीचे निश्चित कारण सांगण्यास नकार दिला आहे. मात्र विजेंदरविरुद्ध पुढे कधीतरी खेळणार असल्याचे सांगितले आहे. विजेंदर मात्र 1 एप्रिलची लढत ठरल्याप्रमाणे खेळणार असून त्याच्या प्रवर्तकांनी याच वजनगटातील प्रतिस्पर्ध्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. ‘कोणत्याही गोष्टीकडे मी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. या लढतीतून माघार घेण्याचे झुल्पिकारकडे निश्चितच काहीतरी कारण असेल. मात्र प्रतिस्पर्धी कोणताही असला तरी मला या लढतीची तयारी करावीच लागणार आहे. माझ्याविरुद्ध खेळण्यास जो कोणी तयार होईल त्याच्याशी मला मुकाबला करणे क्रमप्राप्त आहे,’ असे विजेंदर म्हणाला.

लढत ठरल्याप्रमाणेच होईल
‘आयओए बॉक्सिंग प्रमोटर्सचे एमडी नीरव तोमर म्हणाले की, ‘लढत ठरल्याप्रमाणेच होईल, पण विजेंदरचा प्रतिस्पर्धी दुसरा असेल. झुल्पिकारने आता खेळण्यास नकार दिला असला तरी ही लढत होणारच नाही, असे मानू नका. या वर्षाच्या उत्तरार्धात विजेंदर-झुल्पिकार लढत निश्चितच होईल. पण सध्या आम्ही मुंबईतील लढतीची तयारी करीत असून नवा प्रतिस्पर्धी शोधत आहोत.’ विजेंदरने व्यावसायिक मुष्टियुद्ध क्षेत्रात प्रवेश केल्यापासून आतापर्यंत अपराजित राहिला आहे. त्याने आपला आशियाई किताब डिसेंबरमध्ये स्वतःकडेच राखण्यात यश मिळविले आहे. 1 एप्रिल रोजी होणाऱ्या मुंबईतील लढतीत ऑलिम्पियन अखिर कुमार व जितेंदर कुमार यांची पहिलीच व्यावसायिक लढत असेल.

विजेंदरकडे आशिया-पॅसिफिक बेल्ट
भारतीय बॉक्सर विजेंदर सिंहकडे डब्ल्यूबीओ आशिया-पॅसिफिक बेल्ट आहे, तर चिनी बॉक्सर झुल्फिकारकडे डब्ल्यूबीओ ओरिएंटल किताब आहे. या दोघांमध्ये सामना झाला असता तर विजेत्याला आपल्या प्रतिस्पर्ध्याचा किताब पटकावता आला असता. विजेंदर सिंह १ एप्रिलला रिंगमध्ये उतरणार आहे. चीनच्या बॉक्सरने माघार घेतल्याने त्याच वजनी गटातील आंतरराष्ट्रीय खेळाडूचा शोध घेण्याचे काम प्रवर्तकांकडून सुरू आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूचा शोध घेण्यात ते नक्कीच यशस्वी ठरतील, असा मला विश्वास आहे. माझ्याशी लढण्यास कोणीही तयार असेल तरी ते आव्हान स्वीकारण्याची माझी तयारी आहे, असे विजेंदर सिंह याने सांगितले.