बीजिंग – भारत आणि काही आशिया-पॅसिफिक देशांकडून घेतले जाणारे आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. चीनच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने ही घोषणा केली असुन १ जुलैपासून आयात दरात कपात करण्यात येणार आहे. चीनकडून करण्यात आलेली ही दरकपात भारतासह दक्षिण कोरिया, बांगलादेश, लाओस आणि श्रीलंका या देशामधून आयातीत उत्पादनावर असणार आहे. रसायने, कृषी उत्पादने, वैद्यकीय साधने, पोलाद आणि अॅल्युमिनियम उत्पादनांसारख्या मालावरील आयात शुल्कात सूट दिली जाणार आहे.
या पाच देशांतील सर्व आयात केलेले उत्पादनाचे दर हे आशिया-पॅसिफिक व्यापार कराराच्या दुसऱया दुरुस्तीप्रमाणे असणार आहेत. दरम्यान, दर कपातीसाठी चीनने घोषित केलेल्या उत्पादनाच्या यादीत आणखी उत्पादनांचा समावेश करावा विशेषत: माहिती तंत्रज्ञान व औषध निर्माण क्षेत्रासाठी तरतूद करावी यासाठी भारत चीनवर दबाव टाकत आहे.
एप्रिल महिन्यामध्ये भारत-चीन यांच्यात झालेल्या बैठकीत धोरणात्मक चर्चा करण्यात आली होती. या चर्चेत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी भारताकडून चीनला सोयाबीन आणि साखरेची निर्यात संदर्भात बोलणी केली होती.