चीनची पुन्हा दादागिरी!

0

डोकलाम आमचाच प्रदेश

नवी दिल्ली : डोकलाम क्षेत्रात तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात तिथे चीनने स्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्यामुळे डोकलामचा वाद निर्माण झाला असे वक्तव्य चीनमधील भारतीय राजदूत गौतम बंबावाले यांनी केले होते. त्याला चीनने उत्तर दिले आहे. डोकलाम आमचाच भूभाग आहे हे भारताने लक्षात घ्यावे. मागच्यावर्षी डोकलामवरुन संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. त्यातून भारताने धडा घ्यावा, असे चीनने म्हटले आहे.

जुन्या ऐतिहासिक करारांनुसार आमचाच भाग!
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ह्युआ च्युनयिंग यांनी बीजिंगमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, जुन्या ऐतिहासिक करारांनुसार डोकलाम आमचाच भूभाग आहे. आमच्या सार्वभौम अधिकारातंर्गत आम्ही तिथे हालचाली करत आहोत. मागच्यावर्षी प्रयत्न करुन आम्ही या विषयावर तोडगा काढला. मागच्यावर्षी जे काही घडले त्यातून भारताने धडा घ्यावा आणि सीमेवर विकासासाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी चीनसोबत काम करावे. हाँगकाँगस्थित साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला गौतम बंबावाले यांनी दिलेल्या मुलाखतीत डोकलाममधल्या परिस्थितीसाठी चीनला जबाबदार धरले होते. चीनने तिथे स्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्यामुळे संघर्ष उदभवला, असे बंबावाले म्हणाले.