बीजिंग : डोकलाम क्षेत्रात भारत आणि चीन यांच्यात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना, आता चीनने भारताचे 400 जवान डोकलाम क्षेत्रात बुलडोझर घेऊन घुसले आहेत, असा दावा केला आहे. हे सैनिक तब्बल 180 मीटर आतमध्ये आल्याचा दावाही चीनने केला. भारताने तातडीने आपले सैन्य मागे घ्यावे, अन्यथा परिणाम चांगले होणार नाहीत, अशी धमकीही चीनने दिली आहे. भारताविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी चीन फक्त निमित्त शोधत आहे, अशी माहिती लष्करी तज्ज्ञांनी दिली आहे.
चीन म्हणतो, संयमाची हद्द संपली
चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, की भारताचे जवळपास 400 सैनिक चीनच्या सीमेत 180 मीटर आत आले आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे सैन्य चिनी सीमेत दिसून येत आहे. 40 तुकड्या आणि काही बुलडोझर या भागात खोदकाम करत असल्याचेही सांगण्यात आले. या घटनेबाबत भारताकडे तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली असून, भारताकडून आपली बाजू योग्य असल्याचेच सांगितले जात आहे. भारताने त्वरित आपले सैन्य मागे घ्यावे, अशी मागणीही चीनने केली. भारतीय सीमेवर चीनने पूर्णपणे संयम बाळगला असून, आता या संयमाची हद्द संपत आली आहे, असा इशाराही चीनच्यावतीने देण्यात आला.
उत्तराखंड सीमेवर बंकर बांधण्यास सुरुवात
डोकलाम सीमावादावरून भारत-चीन यांच्यात वाढलेला तणाव, उत्तराखंडमधील चमोली सीमेवर चिनी सैनिकांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न, या पार्श्वभूमीवर भारताने उत्तराखंड येथील सीमारेषेवर बंकर उभारण्यास सुरुवात केली आहे. लष्कराच्या बंगाल इंजिनियरिंग ग्रुपने (बीईजी) सीमेवर नवे बंकर उभारण्याबरोबरच जुन्या बंकरची डागडुजी करण्यास सुरुवात केली आहे. उत्तराखंडमधील भारत-चीन सीमेवर 1962 च्या युद्धानंतर पहिल्यांदाच सैनिक एवढे सक्रीय झालेले दिसत आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील बाराहोटी सीमारेषेवर 25 जुलैरोजी चिनी सैनिकांनी घुसखोरी केली होती. त्यानंतर या भागात लष्कराने हायअॅलर्ट जारी केला असून, कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.