बीजिंग : सिक्किम सीमेवरील डोकलाम वादावरुन चीनने पुन्हा एकदा भारताला इशारा दिला आहे. आतापर्यंत चीनने खूप संयम दाखवला. मात्र सहनशीलतेचीही एक सीमा असते, अशा शब्दांमध्ये चीनने भारताला धमकी दिली. आतापर्यंत आम्ही डोकलाम प्रश्नांवर अतिशय चांगुलपणा दाखवला. मात्र आता भारताने संयमाचा अंत पाहू नये, असे म्हणत चीनने पुन्हा एकदा भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सीमेवर शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी भारताने योग्य पावले उचलावीत, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते रेन गुआकियांग यांनी भारताला ठणकावले.
दोन्ही देश 100 मीटरवर आमने-सामने
भारतीय लष्कर व चीनचे जवान केवळ 100 मीटरवर आमने-सामने आलेले आहेत. दोन्ही बाजूच्या जवानांनी डोकलाम भागात एकमेकांसमोर 9 जुलैपासून तंबू ठोकलेले असून, 60-70 सैनिकांची तुकडी सीमेवर दिसत असली तरी, कोणत्याहीक्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता पाहाता, दोन्ही देशांनी आपल्या सीमेवर मोठ्याप्रमाणात सैन्य व शस्त्रांस्त्रांची जमवाजमव केलेली आहे. सैन्य मागे घेण्याची चीनची मागणी भारताने फेटाळून लावली असून, भारताने आपली भूमिका चीनकडे मांडलेली आहे. डोकलामप्रकरणी भारताची भूमिका, तणावावर मार्ग काढण्यासाठीचा उपाय याबाबत चीनला आम्ही कळवले आहे. या प्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही देशांनी एक सिस्टिम बनवली असून, दोन्ही देशाचे कूटनीतीतज्ज्ञ याप्रश्नी चर्चा करत आहेत, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागवे यांनी दिली आहे.
चिनी सैन्याला कमी लेखू नका!
जेव्हापासून डोकलाम वादाला सुरुवात झाली, तेव्हापासूनच चीनने अतिशय चांगुलपणा दाखवला. हा प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी चीनकडून कूटनीतीचाही वापर करण्यात आला आहे. द्विपक्षीय संबंध सलोख्याचे राहावेत यासाठी चिनी सैन्याने आतापर्यंत खूप संयम बाळगला आहे. मात्र संयमाचीदेखील काही सीमा असते, अशा शब्दांमध्ये गुनकियांग यांनी पुन्हा एकदा भारताला इशारा दिला. डोकलाम प्रश्नावर वेळकाढूपणा करणार्या भारताने आपल्या भ्रमातून लवकर बाहेर यावे, असेदेखील गुनकियांग म्हणाले. चिनी सैन्याच्या क्षमतेवर, संरक्षण सिद्धतेवर कोणत्याही देशाने शंका बाळगू नये. चिनी सैन्याच्या शौर्याला कमी लेखण्याची चूक कोणत्याही देशाने करु नये. देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला चिनी सैन्य मागेपुढे पाहणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
युद्ध हा उपाय नाही : भारताची भूमिका
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चिनी सुरक्षा सल्लागारांची काही दिवसांपूर्वीच भेट घेतली. यानंतर गुरुवारी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी डोकलाम प्रश्नावर राज्यसभेत सरकारची भूमिका स्पष्ट केली. चीनशी युद्ध हा या प्रश्नावरील उपाय असू शकत नाही, असे स्वराज यांनी राज्यसभेत सांगितले. युद्धामुळे प्रश्न सुटत नाही. युद्धानंतरही संवादाच्या माध्यमातूनच मार्ग काढावा लागतो, असेही त्यांनी सांगितले. भारत, चीन आणि भूतानच्या सीमेवरील डोकलाम या वादग्रस्त भागात चिनी लष्कराकडून रस्त्याची निर्मिती केली जाते. चिनी लष्कराच्या या रस्तेनिर्मितीला भारताने विरोध केला आहे. डोकलाममधील भागावर चीन आणि भूतानने दावा केला आहे. या भागातून सैन्य मागे घेण्यासाठी चीनकडून वारंवार भारतावर दबाव टाकण्यात येतो आहे. मात्र भारतीय लष्कराचे जवान या भागात पाय रोवून उभे आहेत. भौगोलिक स्थानाच्या दृष्टीने डोकलामचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने भारतीय लष्कराने या भागातून मागे हटण्यास नकार दिला आहे.