चीनची 30 दिवसात 35 वेळा घुसखोरी

0

आयटीबीपीचा गृहमंत्रालयाला अहवाल

नवी दिल्ली : गेल्या एका महिन्यात चीनने लडाख आणि अरुणाचल प्रदेशात सर्वाधिक घुसखोरी केली. गेल्या 30 दिवसांमध्ये चीनच्या सैन्याने तब्बल 35 वेळेस सीमारेषा पार केली होती. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) विरोध केल्यानंतर चिनी सैन्य परतले. आयटीबीपीच्या अहवालात याबाबत खुलासा करण्यात आला आहे. आयटीबीपीने गृह मंत्रालयाला हा अहवाल पाठवला आहे.

हेलिकॉप्टरने घुसखोरी केली
चीनने या महिन्यातच उत्तर लडाखमध्ये सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास 14 किमी भारतीय क्षेत्रात घुसखोरी केली. पण आयटीबीपीने त्यांना परतण्यास भाग पाडले. लडाखच्या ट्रिग हाईटमध्ये मार्च महिन्यात 18 मार्च, 21 मार्च, 24 मार्च आणि 30 मार्च रोजी दोनवेळेस 8 किमीपर्यंत चिनी सैन्य घुसले होते. लडाखच्या ट्रॅक जंक्शन येथे चिनच्या दोन हेलीकॉप्टरने घुसखोरी केली. भारताच्या हवाई हद्दीत 18 किलोमीटरपर्यंत हेलीकॉप्टर घुसले होते.

चीनचे सैन्य असफिलामध्ये घुसले
29 आणि 30 मार्च रोजी चीनचे सैन्य अरुणाचल प्रदेशच्या असफिला परिसरात 4 किलोमीटर आतमध्ये घुसले होते, असे आयटीबीपीने गृह मंत्रालयाला दिलेल्या अहवालात म्हटले आहे. 22 मार्च रोजी अरुणाचलच्या डिचु येथे चीनचे सैन्य 250 मिटर आतपर्यंत घुसखोरी करून आले. मात्र, आयटीबीपीसोबत त्यांची बाचाबाची झाली आणि काही तासांनी त्यांचे सैन्य परतले. 28 मार्चला लडाखच्या डेसपांग परिसरात 19 किलोमीटरपर्यंत भारतीय सीमेत दाखल झाल्यानंतर चिनी सैन्य परतले. अशा प्रकारे 30 दिवसात चिनने 35 वेळा घुसखोरी केली आहे.