नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर सद्या प्रचंड तणाव निर्माण झाला असून, दोन्ही देशाचे सैन्य आमने-सामने उभे ठाकलेले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वपक्षीय नेत्यांची महत्वपूर्ण बैठक बोलावली असून, या बैठकीत परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज या सिक्कीम सीमेवरील परिस्थितीबाबत सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना अवगत करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता ही बैठक केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी होणार असून, राजकीय पक्षांना रितसर निमंत्रणही देण्यात आलेले आहे. डोकलाम, डोका ला आणि डोंगयोंग या सीमाभागात सद्या सीमेवरून चीन व भारतामध्ये प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे. सद्या दोन्ही देशाचे सैन्य नॉन कॉम्बेटिव्ह (न लढण्याच्या) मोडमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहे. भारताने पहिल्यांदा आपले सैन्य मागे घ्यावे नंतरच चर्चा करू, अशी भूमिका चीनने घेतलेली आहे. त्यामुळे दोन्ही देशांदरम्यान राजनैतिक पातळीवरदेखील तणाव निर्माण झालेला आहे.
भारताकडून क्षेपणास्त्रे, अणुबॉम्बची निर्मिती
अमेरिकेचे अणु विशेषज्ञांच्या मतानुसार, भारत सातत्याने आपले अण्वस्त्रे अत्याधुनिक करत चालला असून, परंपरागत शत्रू पाकिस्तानला नजरेसमोर ठेवून अण्वस्त्रनीती तयार करणार्या भारताने आता चीनला नजरेसमोर ठेवून आपली अण्वस्त्रनीती तयार करण्याकडे कल वळविला आहे. आफ्टर मीडनाईड या जर्नलमध्ये प्रकाशित एका लेखानुसार, भारत अशाप्रकारे क्षेपणास्त्रे विकसित करत आहे, की जेणेकरून दक्षिण तळावरून संपूर्ण चीनला लक्ष्य केले जाईल. भारताकडे सद्या 150-200 अणुबॉम्ब तयार करण्याइतके प्लुटोनियम असल्याचा गौप्यस्फोटही तज्ज्ञांनी केलेला आहे.
काय म्हणतो चीन…
चीनचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले, की भारतीय सैनिकांनी परंपरागतरित्या मान्य असलेल्या सीमा भागात गैरप्रकारे प्रवेश केलेला आहे. हा भाग यापूर्वी झालेल्या युद्धक्षेत्राच्या कक्षेबाहेरचा आहे. 1890 मध्ये चीन व भारताने मान्यता दिलेल्या करारानुसार सिक्कीम हा भाग स्वतंत्र असून, हा करार चीन व भारत दोघांनीही पाळायला हवा. त्यामुळे भारताने आपले सैनिक तातडीने वादग्रस्त भागातून परत बोलवावे, अशी मागणीही शुआंग यांनी केली आहे. सीमा भागात निर्माण झालेला तणाव व चीनची अडेलतट्टू भूमिका पाहाता, केंद्र सरकारने याप्रश्नी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतलेला आहे.