मुंबई – भारत आणि चीन दरम्यान सीमेवरील तणाव वाढतच आहे. चीन म्हणतोय सिक्कीम-भूतान सीमेवरून सैन्य हटवा तरच चर्चा, भारतही सैन्य मागे घ्यायला तयार नाही. या सर्व घडामोडींदरम्यान बिजिंगमध्ये ब्रिक्स संघटनेची बैठक होत आहे. चीनने आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या मते डोकलाम सीमावाद भडकवण्यासाठी डोवलच जबाबदार आहेत. इंडियन जेम्स बॉण्ड म्हणून ओळखले जाणाऱ्या डोवल यांना पाकिस्तानही घाबरून असतो.
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तेव्हापासून ते चिनकडे लक्ष ठेऊन आहेत. सप्टेंबर २०१४ मध्ये चीनचे अध्यक्ष झि जिनपिंग यांना मोदी यांनी भारतभेटीचे निमंत्रण दिले. तेव्हा अहमदाबादमध्ये झोपाळ्यावरही झुलवले. वाटले होते की मोदींना चीनची गुंतवणूक हवी आहे. त्यानंतर चीनने भारत अमेरिकेजवळ जात आहे, हे पाहिले व तो बदलला. भारताच्या सीमांवर घुसखोरी करण्याचे प्रकार चीनने चालवले. अजित डोवल नरेंद्र मोदींच्या खास विश्वासातले आहेत. त्यांनी चीन प्रश्न डोवल यांच्यावरच सोडला आहे. चीनबाबत काही प्रकरण आले की डोवल सक्रीय झाले. डोकलाम प्रश्नी डोवल अतिशय सक्रीय झाल्याचे दिसत आहे.
चीन सीमावादाबद्दल २० वी बैठक….
भारत चीनचे राष्ट्रीय सल्लागार गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भेटले होते. ती १९ वी बैठक होती. तेव्हा दोन्ही देशातील सीमा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा असा ठराव झाला होता. २० बैठक भारतात होणार आहे. त्यासाठी एक समितीही बनविण्यात आलेली आहे. समितीचे प्रमुख डोवल आहेत.
चीन का घाबरतोय डोवलना…..
डोवल संरक्षण सल्लागार बनल्यानंतर भारत आक्रमक बनलेला आहे. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक, म्यानमारमध्ये जाऊन दहशतवाद्यांना टीपणे या घटनांमधून डोवल यांचा सल्ला मानला जात जात आहे हे जगाच्या लक्षात आलेले आहे. चीन सीमा प्रकरणात आक्रमक बनण्याचा सल्ला डोवल यांचाच आहे. मोदी डोवल यांचे ऐकतात, हे चीनला माहित आहे.
डोवल यांचा इतिहास
डोवल एक अग्रगण्य गुप्तहेर म्हणून ओळखले जातात. ते भारतीय गुप्तहेर यंत्रणा रॉसाठी सहा वर्षे पाकिस्तानात हेरगिरी करीत होते. त्यासाठी ते पाकिस्तानात मुस्लिम बनून रहात होते. २००५ मध्ये ते इंटेलिजन्स ब्युरोच्या संचालकपदावरून निवृत्त झाले. २००९ मध्ये ते विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बनले. वृत्तपत्रांमध्येही त्यांनी लेखन केले.