चीनच्या आर्थिक नाड्या आवळा, जयंत पाटील यांचे आवाहन

0

रायगड: भारतीय नागरिकांवरील हल्ले, सैनिकांवर हल्ले यामुळे चीनची दंडेली संपविण्याची गरज आहे. सीमेवर भारतीय लष्कर चीनला जशासतसे उत्तर देण्यास सक्षम असतानाच लष्कराच्या समर्थनार्थ आता सर्वसामान्य नागरिक म्हणून आपणही सक्रीय होणे क्रमप्राप्त आहे. सीमेवर जाऊन लढणे सर्वसामान्य नागरिकाला शक्य नसले, तरीही चीनची आर्थिक कोंडी करणे सर्वस्वी आपल्याच हातात आहे, त्यामुळे चीनची आर्थिक नाड्या आवळा, असे आवाहन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले आहे. शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाच्या अलिबाग येथे झालेल्या बैठकीत तसा एक ठराव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

चिनी वस्तूंचा वापर थांबवा
यावेळी आमदार जयंत पाटील पुढे म्हणाले की, चीन जर भारतीय सार्वभौमत्वावर आक्रमण करणार असेल, तर राष्ट्रप्रेमी भारतीय हे कदापी सहन करणार नाहीत. हा संदेश चीनपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वस्त चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून चीनची आर्थिक कोेंडी करण्यासाठी प्रत्येकाने स्वदेशी वस्तूू वापरण्यावर भर द्यायला हवा. यासह बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतात तयार झालेली उत्पादने वापरतानाच चिनी वस्तूंचा वापर थांबवायला हवा.

चीनच्या कांगाव्याला द्या उत्तर
दोन पैशांंनी स्वस्त मिळणार्या वस्तूंच्या माध्यमातून आपली स्वदेशी बाजारपेठ पोखरण्याची संधी चीनला द्यायला नको. हे पूर्णपणे भारतीय ग्राहकांवर अवलंंबून आहे. त्यामुळेच चिनी मालाचा बहिष्कार करून चीनच्या कांगाव्याला उत्तर देण्यासह स्वदेशी बाजारपेठ अधिक सुदृढ करण्याची जबाबदारी आपण पार पाडायला हवी.

स्वस्त मालाच्या बाजारपेठेच्या जोरावर चीनची आर्थिक प्रगती होत आहे. तोच पैसा चीन साम्राज्य विस्तारासाठी वापरत आहे. यामुळे स्थानिक बाजारपेठा, तेथील उद्योजक आणि तरुणांना उद्ध्वस्त करीत आहे. त्यासाठी चिनी मालाचा बहिष्कार हे एकमेव अस्र आहे.
आमदार जयंत पाटील

मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीला विवेक पाटील, आमदार पंडितशेठ पाटील, आमदार धैर्यशील पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, राजिपचे उपाध्यक्ष अस्वाद पाटील, प्रशांत नाईक, चित्रलेखा पाटील, जिल्हा कार्यालय चिटणीस परेश देशमुख, विलास थोरवे, सुरेख खैरे, तसेच सर्व तालुक्यांतील चिटणीस व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.