चीनच्या भारत प्रशंसेने अस्वस्थता

0

नवी दिल्ली : सिक्किम सीमेवर भारत, चीन आमनेसामने उभे ठाकलेले असतानाच आणि चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमे भारतावर दबाव टाकत असतानाच आश्चर्यचकीत करणारी एक बातमी आलेली आहे. चीनने पंतप्रधान मोदी आणि भारताच्या खुल्या आर्थिक परराष्ट्रीय धोरणाचे कौतुक केले आहे. डोकलाम तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनची ही प्रशंसा आनंदापेक्षा अस्वस्थच जास्त करीत आहे.

चीनच्या प्रसारमाध्यमांनी लेख आणि बातम्यांद्वारे भारतावर दबाव टाकण्याचे सत्र अवलंबिले होते. सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने कालच प्रसिद्ध केले की भारत मागील दोन वर्षात थेट परकिय गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी होत आहे. त्यासाठी देशांतर्गत अनुकूल वातावरण तयार झाले आहे. चीनसोबतचा द्विपक्षीय व्यापारही उत्तम सहयोगातून वाढत आहे. देशातील उद्योगांना जागतिक बाजारपेठेत उतरण्यासाठी भारत सरकार प्रोत्साहन देत आहे, असेही शिन्हुआने म्हटले आहे. जागतिक समुदायात भारत आणि चीनचे विचार मिळतेजुळते आहेत हे पॅरिस कराराच्या निमित्ताने दिसून आले अशी प्रशंसाही चीनच्या वृत्तसंस्थेने केली आहे.