नवी दिल्ली । स्वस्त आणि दुय्यम दर्जांच्या उत्पादनांच्या जोरावर चीनने जागतिक बाजारात मोठ हिश्श्यावर आपली मक्तेदारी केली होती. पण गुणवत्ता आणि विश्वासार्हतेचा मुद्दा आला की मेड इन चीनपेक्षा मेड इन इंडियाला जागतिक बाजारपेठेत मोठी पसंती मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. युरोपियन संघ आणि जगातील आघाडीच्या 49 देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे. या सर्वेक्षणात भारताला 36 गुण मिळाले आहेत, तर चीनला 28 गुण देण्यात आले आहेत. स्टॅटिस्टा आणि आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था असलेल्या डालिया यांनी संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणाचा मेड इन कंट्री इंडेक्स सोमवारी जाहिर करण्यात आला.
या मेड इन कंट्री इंडेक्समध्ये (एमआयसीआय 2017) उत्पादनांच्या दर्जाबाबत चीन भारताच्या तुलनेत सात क्रमांकांने पिछाडीवर आहे. या क्रमवारीत 100 गुणांसह जर्मनी पहिल्या क्रमांकावर आहे तर स्वित्झर्लंड दुसर्या क्रमांकावर आहे. भारताचा या यादीत 42 वा तर चीनचा 49 वा क्रमांक आहे. हे सर्वेक्षण करताना जगभरातील 43,034 ग्राहकांचे मत विचारण्यात आले होते. त्यात उत्पादनांची गुणवत्ता, सुरक्षा मानक, किमतीचा मोबदला, उत्पादनाचे वैशिष्ट्य, आरेखन, प्रगत तंत्र, विश्वासार्हता, टिकाऊपणा, उत्पादनाची प्रतिष्ठा या प्रश्नांचा समावेश होता. या सर्वेक्षणात चीनी उत्पादनांचा पोलखोल करण्यात आला आहे. कच्च्या मालाच्या किमान उपलब्धतेमुळे चीनमध्ये उत्पादनांसाठी सुमार दर्जाचा कच्चा माल वापरला जातो. त्यात मनुष्यबळ स्वस्त असल्याने,जागतिक बाजारपेठेत कमी किमतीचा मोठा माल चीन उतरवत असते. पण त्यांच्या अनेक उत्पादनांचा दर्जा बाजारात उघड झाला. चीनच्या अनेक उत्पादनांना जागतिक गुणवत्तेच्या मानकात स्थान मिळालेले नाही.
ज्या प्रमाणे जागतिक बाजारपेठेत चीन स्वस्त पण तकलादू उत्पादने उतरवत असतो. तशाच पद्धतीने गेल्या शतकात जर्मनीने जागतिक बाजारपेठेत धुमाकुळ घातला होता. आता जर्मनीच्या उत्पादनांना आणि तंत्रद्यानाला मोठी किंमत मिळत नाही. पण गेल्या शतकात जर्मनीने सुमार दर्जाचे आणि देशातील मोठमोठ्या बॅ्रंडंची बनावट उत्पादने मोठ्या प्रमाणात ब्रिटनला निर्यात केली होती. त्यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊन ती अडचणीत आली होती. या संकटावर मात करण्यासाठी आणि बनावट उत्पादंनापासून वाचण्यासाठी ब्रिटनने मेड इन लेबलची सुरुवात केली.
पंतप्रधानांच्या प्रयत्नांचे यश
केंद्रात सत्ता मिळवल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या योजंनामार्फत देशात मेक इन इंडिया ची मोहीम राबवली होती. त्यामुळे पाणबुडीपासून उपग्रहापर्यंत सर्व काही भारतात तयार व्हायला लागले आहे. 2014 मध्ये पूर्णपणे भारतीय उत्पादकांनी बनवलेले मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे स्थापित करणारा भारत जगातील एकमेव देश बनला.