चीनमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत महापौर जयवंत सुतार यांनी उमटवली नाममुद्रा

0

नवी मुंबई । चीन देशातील झेंगझाऊ शहरात संपन्न झालेल्या ‘इंटरनॅशनल मेयर्स फोरम ऑफ टुरिझम 2018’ या आंतराष्ट्रीय परिषदेस नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी नवी मुंबई शहराचे प्रतिनिधित्व करीत जागतिक स्तरावर नवी मुंबईच्या आधुनिकतेची नाममुद्रा उमटविली.आजच्या सामायिक अर्थव्यवस्थेच्या युगात शहर पर्यटनात नावीन्यपूर्णता आणण्यासाठी जगभरातील विविध शहरांच्या महापौरांकडून त्या त्या शहरांतील पर्यटनविषयक वैशिष्ट्यपूर्ण बाबींची माहिती, अनुभव सादरीकरणाव्दारे जाणून घेणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींकडून शहरातील पर्यटनविषयक विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेणे असे या परिषदेचे स्वरूप होते.

या परिषदेत व्यासपीठावरून मनोगत व्यक्त करताना नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी 108 चौ. कि.मी.च्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तब्बल 200 हून अधिक उद्याने, हरितपट्टे महानगरपालिकेने विकसित केले असल्याचे सांगत यामुळे नवी मुंबई शहराला भारत देशातील ‘21 व्या शतकातील शहरा’प्रमाणेच ‘गार्डन सिटी’ असेही संबोधले जात असल्याचे अभिमानाने सांगितले. यामध्ये प्रामुख्याने विशिष्ट संकल्पनांवर आधारित ‘थिम पार्क’ जसे की, जगातील 7 आश्‍चर्यांच्या प्रतिकृती असणारे वंडर्स पार्क, जापनीज तत्वज्ञानावर आधारित झेन गार्डन, रॉक गार्डन, मँगो गार्डन, ज्वेल ऑफ नवी मुंबई, साने गुरूजी बालोद्यान विकसित करण्यात आली आहे.