भुसावळ। भुसावळच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी चीनमध्ये जाऊन त्यांना त्यांच्याच धर्तीवर हरविणे ही भुसावळकरांसह देशासाठी अभिमानास्पद बाब असून कुस्तीचा जन्म हा भारतात झाला असून आपल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटने चीनच्या रोबोटला हरवून दुहेरी विक्रम प्रस्थापित केला आहे. यात कुस्तीमधील भारताचे प्रावीण्य कायम ठेवले व तंत्रज्ञानात अव्वल असलेल्या चीनच्या संघाला पराभूत केल्याने हे यश अभूतपूर्व असल्याचे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी केले. यश मिळवणार्या अभियंत्यांच्या रॅलीचे शहरवासीयांनी दुपारी स्वागत केले.
तंत्रज्ञानाच्या लढाईत सक्षम
गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या ब्लँकाबोर्ड संघाने चीनमधील ग्वाँझाऊत येथे झालेल्या रोबोवार स्पर्धेत आंतरराष्ट्रीय संघांना धोबीपछाड देऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या लढाईत आम्हीही सक्षम असल्याचा संदेश दिला आहे. या विजयी संघाची शनिवारी दुपारी दोन वाजता मिरवणूक काढण्यात येऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
ढोल-ताशांच्या गजरात काढली मिरवणूक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून या विजयी संघाची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघाली. विनय चौधरी, योगेश गाजरे, शुभम नेमाडे, अनिकेत किनगे, रवींद्र आभाळे, मोहित चौधरी, शुभम दुसाने, विरेंद्रसिंह खंडाळे आदींनी यश मिळवले.
भुसावळचे नावलौकिक
माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी विजयी संघास शुभेच्छा देत स्पर्धेने जग जिंकता येते याचा अनुभव प्रत्यक्ष याठिकाणी आला असल्याचे सांगत 24 देशांच्या स्पर्धेत भुसावळच्या मुलांनी बाजी मारली. त्यामुळे भुसावळ शहराचा जगभरात नावलौकिक झाला असल्याचे सांगितले. तसेच या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस केवळ विजयी होण्याचा ध्यास समोर ठेवून संशोधन केले. त्यामुळेच चीनसारख्या तंत्रज्ञानात मातब्बर असणार्या देशाच्या संघासोबत कडवी झुंज देत भुसावळच्या संघाने विजय मिळवला. ही बाब सर्वांसाठी गौरवास्पद असल्याचेही व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. गिरीष कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या पालकांसह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.