चीनमध्ये स्टार्ट अप कंपनीच्या तीन लाख छत्र्या चोरीला

0

घरोघरी मातीच्या चुली असं म्हणतात. घेतलेली वस्तू परत न करणं हा कुठल्याही देशातील मानवी स्वभाव. चीनमध्ये याचाच प्रत्यय छत्र्यांच्या कंपनीला आला आहे. एका विक्री ऑफर स्कीम अंतर्गत परत करण्याच्या अटीवर दिलेल्या तीन लाख छत्र्या लोकांनी परत केल्याच नाहीत. या चोरीमुळे ग्राहकांच्या चांगुलपणावरील विश्वास ठेवलेल्या उद्योजकावर उर बडवण्याची वेळ आली आहे.

शेअरींग इ अंब्रेलाज या कंपनीने नवा व्यवसाय सुरू केला. नवी कल्पना राबवित असल्याचा उत्साह मोठा दांडगा होता. बस स्टँड आणि अंतर्गत रस्त्यांवर कंपनीने छत्र्यांच्या रॅक ठेवल्या. ज्या कुणाला छत्री हवी त्याने मोबाईलवर रिक्वेस्ट पाठवून कोडनुसार नोंदणी करायची आणि छत्री घेऊन जायची. त्यासाठी अर्थातच भाड्यापोटी अर्ध्या तासाचे ५० युवान मोजायचे. इतक्या अटी घातल्या पण छत्री परत न केल्यास काय दंड असेल हे काही कंपनीने सांगितले नाही. नेमके हेच लोकांच्या पथ्थ्यावर पडले. त्यांनी छत्र्या परत केल्याच नाही.

लोकांच्या वस्तादपणामुळे पुरते शेकलेले शेअरींग इ अंब्रेलाज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाओ शुपिंग म्हणतात सायकली भाड्याने मिळतात तशा छत्र्या भाड्याने देऊ अशी आमची आयडिया होती. भविष्यात छत्र्यांवर जाहिरातीही छापून उत्पन्न वाढवण्याची आमची कल्पना होती. आता कसल्या जाहिराती आणि कसले काय. छत्र्याच गेल्या.

परंतु असा प्रतिसाद मिळाल्यामुळे कंपनीची उद्योजकता आता चक्राऊन गेली आहे. शांघाय, नानजिंग, गोंगझोउ अशा मोठ्या शहरांमधील लोकांनी छत्री कंपनीला असा धडा दिला आहे.

लोकांनी कदाचित एका पेक्षा जास्त छत्र्या घरी नेल्या असल्या पाहिजेत, असेही कंपनीला वाटत आहे. आता काहीही झाले तरी तोटा झाला तो झालाच आणि कंपनीवर अरण्यरूदन करण्याची आफत आली.