चीनमध्ये हुकूमशाहीचा उदय?

0

तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी शी जिनपिंग यांनी कायदा बदलला
चीनच्या संसदेत कायदा बहुमताने मंजूर

बीजिंग : चीनमध्ये एका व्यक्तीला जास्तीत-जास्त फक्त 2 वेळा राष्ट्राध्यक्ष होता येईल असा कायदा होता. चीनच्या संसदेने नवीन कायदा मंजूर करून ही अट रद्दबातल केली आहे. जेणेकरून शी जिनपिंग आता तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष पदासाठी पात्र ठरले आहेत. ही घटनादुरुस्ती मंजूर करून चीनच्या संसदेने जगाचे लक्ष वेधले आहे. या नवीन कायद्याच्या आधारे चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान राहू शकतात अशी भिती आहे. यामुळे चीनमध्ये हुकूमशाहीचा उदय होऊ शकतो, अशी भिती वर्तविली जात आहे.

कमाल मर्यादाच रद्द केली
चीनच्या संसदेने दोनदा राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची कमाल मर्यादा हटवल्याने शी जिनपिंग यांचा तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कायद्याला चिनी काँग्रेसच्या 2964 सदस्यांपैकी फक्त 2 जणांनी विरोध केला. इतर 3 जण मतदानाच्या वेळी अनुपस्थित होते. 64 वर्षीय शी जिनपिंग सलग दुसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष पदावर आहेत. कायद्यानुसार, त्यांना तिसर्‍यांदा निवडणूक लढवता येत नव्हती. त्यामुळे, आता त्यांनी पाशवी बहुमताच्या बळावर संसदेत 2 वेळा निवडणुकीची कमाल मर्यादाच रद्द केली. अशात चीनचे आतापर्यंतचे सर्वात शक्तीशाली नेते माओत्से तुंग यांच्यानंतर शी जिनपिंग दुसरे सर्वात ताकदवान नेते ठरले आहेत.

स्वत: वेळोवेळी कायद्यात बदल केले
शी जिनपिंग यांनी संरक्षण, सर्वात मोठ्या आणि एकमेव राजकीय पक्षाचे प्रमुख, सर्व महत्वाच्या समित्या यांचे प्रमुख पद स्वीकारले. यासाठी त्यांनी वेळोवेळी कायद्यात सुधारणा देखील केल्या आहेत. चीनमध्ये त्यांच्या तोडीचा एकही नेता सध्या नाही. आता नवीन कायदा मंजूर करून त्यांनी आयुष्यभर राष्ट्राध्यक्षपदी निवडून येत राहण्याचा मार्ग मोकळा केला आहे. चीनचे माओत्से तुंग यांनी 1966 ते 1976 पर्यंत राष्ट्राध्यक्षपद भोगले. त्यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या डेंग जाओपिंग यांनी दुसरा माओ टाळण्यासाठी 1982 मध्ये 2 वेळा राष्ट्राध्यक्ष होण्याची मर्यादा लागू केली होती. आता शी जिनपिंग यांनी ती मर्यादा हटविल्याने चीनमध्ये हुकूमशाही उद्यास येऊ शकते, अशी भिती व्यक्त होत आहे.