चीनमध्ये २००० टनाच्या मंदिराचे स्थलांतर

0

चीनच्या शांघाय शहरातील एका ऐतिहासिक मंदिरात फेरफार करण्यात आले असून, हे मंदिर ३० मीटर दूर सरकावण्यात आले आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी हे करण्यात आले आहे, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. शांघायमध्ये असलेले हे बौद्ध मंदिर १३५ वर्षे जुने आहे. त्याचे वजन २००० टन आहे. येथे येणार्‍या गर्दीत वाढ झाल्यामुळे या मंदिराचे उत्तरेच्या दिशेने ३० मीटर हलवण्यात आले तसेच ते १.०५ मीटर उंच करण्यात आले आहे. मंदिरातील मुख्य हॉलमध्येही बदल करण्यात आले आहेत. हॉलमध्ये असलेल्या बुद्धमूर्ती व अन्य अवशेषही हलवण्यात आले आहेत. या मूर्ती १९०८ ते १९२८ मध्ये स्थापन करण्यात आल्या होत्या.

महावीर मंदिर, असे या मंदिराचे नाव आहे. या मंदिराची निर्मिती १८८२ साली झाली होती. त्याच्या स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ लागला. अचूक विश्‍लेषण केल्यानंतर ही प्रक्रिया पार पाडण्यात आली, असे शांघाय वास्तुशिल्प डिझाइन आणि शोध संस्थेचे मुख्य अभियंता ली यिंग म्हणाले. या मंदिरात थोडी जागा करायची होती जेणेकरून येथील गर्दी कमी व्हावी आणि चेंगराचेंगरीचा धोका कमी व्हावा हा यामागील उद्देश होता, असे जेड बुद्ध मंदिराचे प्रमुख आणि चिनी बौद्ध संघाचे प्रमुख ज्यू जिंग म्हणाले.