नवी दिल्ली – चीनविरोधात भारताची आक्रमक भुमिका कायम असून भारताने गुरुवारी ऑस्ट्रेलियासोबत एक महत्त्वपूर्ण करार करत चीनला अजून एक दणका दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत व्हर्च्युअल बैठक केली. या बैठकीत दोन्ही देशांनी एका महत्त्वाच्या करारावर स्वाक्षर्या केल्या. या कराराअंतर्गत दोन्ही देशांना एकमेकांचे सैन्य तळ वापरता येणार आहेत. नव्या करारानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांची लढाऊ जहाजे आणि लढाऊ विमानं एकमेकांच्या सैन्य तळांचा वापर करू शकणार आहेत. तसंच गरज भासल्यास त्यांना इंधनाचा पुरवठादेखील केला जाणार आहे. हिंद महासागरात चीनचा वाढता हस्तक्षेप पाहता तो रोखण्यासाठी दोन्ही देश एकत्र आल्याचे म्हटले जात आहे. भारताने अमेरिकेसोबतही असाच एक करार केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया आपल्या द्विपक्षीय संबंधांना व्यापकरित्या वाढवण्यास कटिबध्द आहे. हे केवळ या दोन देशांसाठीच नाही तर इंडो-पॅसिफिक क्षेत्र आणि संपूर्ण जगासाठीही आवश्यक आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. या करारामुळे ऑस्ट्रेलिया भारताच्या अंदमान निकोबार येथे असलेल्या नौदलाचा तळ वापरता येणार आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया इंडोनेशिया जवळ असलेल्या कोकोज बेटावरील आपला नौदल तळ भारतासाठी खुला करणार आहे. यामुळे दोन्ही देशांचे नौदल हिंद महासागरातील मलक्का स्ट्रेट आणि आसपासच्या परिसरावर नजर ठेवू शकणार आहे. चीन या क्षेत्रात आपले वर्चस्व वाढवू पाहत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही देशांचे नौदल एकत्रित सरावही करणार आहे. याला ओसइंडेक्स असे नाव देण्यात आले आहे.