इस्लामाबाद । पाकिस्तान आणि चीन यांच्यातील विशेष आर्थिक क्षेत्राला पाकिस्तानातील स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. विरोध दर्शवण्यासाठी सिंध प्रांतातील नागरिक रस्त्यावर उतरले. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, गो बॅक चायना अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. जिये सिंध मुत्ताहिदा महाज (जेएसएमएम) या संघटनेने ही रॅली काढली होती.
पाकिस्तान आणि चीन यांच्यातील व्यापारी संबंध वाढवण्याबरोबरच प्रतिकूल परिस्थितीत दोन्ही देशातील सैनिकांना जाणे-येणे सोयीस्कर व्हावे यासाठी पाकिस्तान विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास करत आहे. या अंतर्गत पाकिस्तान आणि चीन यांच्या दरम्यान महामार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. महामार्गाचा एक भाग गुलाम काश्मीरमधून जात आहे आणि तिथे असलेल्या स्थानिकांचा पाकिस्तान-चीन संयुक्तपणे बांधत असलेल्या रस्त्याला विरोध आहे. महामार्ग विकासाच्या नावाखाली पाकिस्तान आणि चीनचे सैनिक संयुक्तपणे मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आर्थिक क्षेत्र विकसित करण्याचे निमित्त करून स्थानिकांच्या जमिनी बळकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असाही आरोप स्थानिकांकडून होत आहे. बलुचिस्तानमधील नागरिकांनी पाकिस्तान सरकारच्या अन्यायाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनापाठोपाठ आता विशेष आर्थिक क्षेत्राविरोधात भूमिपुत्रांनी पाकिस्तानमध्ये तीव्र आंदोलन सुरू केले आहे.