25 डिसेंबर 2003 ला रावळपिंडीत एक मिलिटरी काफिला चालला होता. पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती मुशर्रफ आपल्या वेगाने जाणार्या मर्सिडिस गाडीतून पाहत होते. एक व्हॅन त्यांच्या काफिल्याकडे विरुद्ध दिशेने जोराने येत होती. एक पोलीस या गाडीला थांबवायचा प्रयत्न करत होता. त्याला चिरडून ती व्हॅन काफिलाच्या शेवटच्या सुरक्षा गाडीला धडकली. प्रचंड स्फोटात दोन्ही गाड्या उद्ध्वस्त झाल्या. मुशर्रफच्या चालकाने ब्रेक मारली. मुशर्रफ ओरडले थांबू नको वेगाने जा. त्यांची गाडी 100 मीटर पुढे गेली, त्याच बरोबर दुसरी गाडी मुशर्रफच्या पाठीमागील गाडीवर धडकली व 40 किलो बॉम्बचा स्फोट झाला. मुशर्रफच्या गाडीचे 3 टायर उडाले. वाहकाने एका टायरवरच गाडी पुढे नेली. मुशर्रफ वाचले. ते म्हणाले, मृत्यू अत्यंत जवळ आला होता. तिसरा बॉम्बर वेळेवर पोहोचला नाही म्हणून वाचलो. हा मुशर्रफवर 2 आठवड्यांतला दुसरा प्रयत्न होता. हे दोन्ही प्रयत्न पाकिस्तानच्या सैन्य मुख्यालयात घडले. हा पाकिस्तानमधील सर्वात सुरक्षित भाग आहे. तिथे 2 हल्ले व्हावेत ही प्रचंड आश्चर्याची गोष्ट होती. त्यातून स्पष्ट होते की पाकिस्तानने आपल्या धरतीमध्ये जे पेरले तेच उगवले.
आज जगात हिंसाचाराचा वणवा पेटला आहे. कुठलाही देश यापासून मुक्त नाही. या सर्वांचे मूळ हे पाकिस्तान आहे. आधुनिक दहशतवादाचा उगम याच शापित भूमीत झाला. पण त्याला जन्म देणारा बाप अमेरिका आणि सौदी अरेबियाच आहे. अफगाणिस्तानमध्ये अनेक जमातीचे वेगवेगळ्या भागात राज्य आहे. त्यांनी केंद्र सरकारला कधीच जुमानले नाही. त्याला शह देण्यासाठी अमेरिकेने सौदी अरेबियाला बरोबर घेऊन पाकिस्तानमध्ये दहशतवादाचा पाया रोवला. जगभरातून दहशतवादी टोळ्या पाकिस्तानमध्ये गोळा केल्या. इस्लामच्या नावावर अमेरिकेने या टोळ्यां पेटवल्या व निधर्मी कम्युनिस्टाविरुद्ध जिहाद पुकारला. अफगाणिस्तानला रशियन सैन्यापासून मुक्त करण्यासाठी धर्मयुद्ध पेटले. हे युद्ध 1991 पर्यंत चालले. या युद्धात जगातील अनेक राष्ट्रांतील दहशतवादी टोळ्यांनी भाग घेतला. त्यातच अल-कायदा, लश्कर-ए-तोयबा, जम्मू-काश्मीर लीब्र्सन फ्रंट, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन अशा अनेक टोळ्या निर्माण झाल्या.
पाकिस्तानचे भारताने 1971ला 2 तुकडे केले तेव्हा भुत्तो म्हणाले होते की भारतावर आम्ही हजार वार करू, आम्ही गवत खाऊ पण अणुबॉम्ब तयार करू. सूड भावनेने पेटलेल्या पाकिस्तानी सैन्याला अमेरिका आणि सौदी अरेबियाने प्रचंड शक्ती दिली आहे. अमेरिका आणि चीन एकमेकांविरोधात दिसत आहेत. पण पाकबाबतीत ते एकत्र आहेत. या सर्व आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भारत शिकार झाला आहे. दुर्दैवाने भारताच्या राजकर्त्यांनी याला योग्यवेळी योग्य कृती न केल्यामुळे भारत एकटा पडत आहे. चीनची समस्या आणखी गहन आहे. चीन-भारत हे स्वातंत्र्यानंतर मित्र झाले. भारत-चीन-रशिया जर एकत्र आले तर अमेरिकेचा पराभव निश्चित होता. म्हणून अमेरिकेने भारतीय गुप्तहेर संघटनेला विकत घेतले. खोटे अहवाल देऊन सीमावाद निर्माण केला. राजकीय अपरिपक्वतेमुळे नेहरूंनी भारतीय सैन्याची कुठलीही तयारी नसताना युद्धात लोटले.
1977 ला राजीव गांधींनी आणि नंतर वाजपेयींनी चीनबरोबर पुन्हा मैत्री करण्यास सुरुवात केली. सीमासंघर्ष सोडवण्यासाठी ठोस पाऊल उचलले. सीमावाद सोडला तर भारत चीनमध्ये कुठलाच वाद नाही. मग पाकिस्तानला नष्ट करण्याचे धोरण सोडून चीनला अंगावर घेण्याची काय गरज आहे? तेच काम मनमोहन सिंग व आता मोदी करत आहेत तेही अमेरिकेला खूश करण्यासाठी. दक्षिण चिनी सागरात भारताचे काय काम आहे? तर आता अमेरिका, जपान व भारत एकत्र चीनविरुद्ध महाकाय सैनिकी नाविक सराव करत आहेत. त्यामुळे चीन आपल्याविरुद्ध पाकला आणखी मदत करत आहे. सीमेवर भानगडी निर्माण करत आहे, याचा सर्वात जास्त फायदा पाकला होत आहे. भारताने आपले हित बघावे. ज्या अमेरिकेने सातत्याने भारताला विकलांग करण्याचा प्रयत्न केला; त्या अमेरिकेसाठी चीनला अंगावर घेण्याचे काय कारण आहे? फक्त वृतपत्र आणि टीव्हीवर गर्जून युद्ध जिंकता येत नाही. त्याला रक्त द्यावे लागते. एका पाकला तुम्हाला नमवता येत नाही. मग गोर्या माणसाला खूश करण्यासाठी तुम्ही देशाला संकटात का घालत आहात? त्यापेक्षा हिंमत असेल, तर एकदाचा पाकचा कायमचा निकाल लावा आणि मग दुसरीकडे बघा.
– ब्रिगेडिअर सुधीर सांवत
9987714929