चीनी अर्थव्यवस्था पोखरताहेत कर्जबुडवे “गेंडे”

0

न्यूयॉर्क : पाश्चिमात्य अर्थव्यवस्था ब्लॅक स्वान अर्थात अर्थव्यवस्थेत अनपेक्षितपणे आणि हटकून येणाऱ्या आर्थिक संकटाने त्रस्त झाल्या आहेत. तर दुसऱ्या बाजुला चीनी अर्थव्यवस्थेला महाकाय मस्तवाल कंपन्यांनी अर्थात आर्थिक गेंड्यांनी (ग्रे राइनो) पोखरले आहे. हा वृत्तांत न्यूयॉर्क टाइम्सने दिला आहे. चीनी सरकारला फार उशीरा या जाड कातडीच्या गेड्यांच्या अंतस्थ हेतुंची जाणीव झाली आहे.

ग्रे राइनो म्हणजे चीनमधील राजकीय व्यवस्थेत घुसखोरी करून जागतिक कंपन्यांची संघटना तयार करणारे बडे उद्योजक. एनबँग इन्श्युरन्स ग्रुप, फोसन इंटरनॅशनल, एचएनए ग्रुप, डेलियन वांडा ग्रुप अशा कंपन्यांनी सरकारी बँकांकडून स्वस्त दरात कर्ज घेऊन आपले साम्राज्य तयार केले आहे.

व्यवसायात त्यांनी इतका जम बसलवलाय की चीन सरकारलाही ते डोईजड होत आहेत. चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांनी नुकताच इशाराही दिला होता की आर्थिक स्थैर्य राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्वाचे आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्रात मात्र ग्रे राइनोंवर टीका करण्यात आलेली आहे. चीनच्या धोरणकर्त्यांना भीती वाटत आहे. ह्या ग्रे राईनो कंपन्यांनी इतके कर्ज बुडवले तर अर्थव्यवस्था पार कोलमडून जाईल. त्यामुळे बँक अधिकारी कंपन्यांचे ताळेबंद तपासण्याच्या कामाला लागले आहेत.