चीनी महिलांशी लगट करणाऱ्याला मिळणार अग्नियंत्राचा चटका

0

बिजिंग : महिलांवर अतिप्रसंग करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडविणारे सिगरेट पेटविण्याच्या लायटर एवढे असलेले आग ओकणारे एक यंत्र चीनी बाजारात आले आहे. शॉपिंग वेबसाईटस वर त्याचे वर्णन विकृतीविरोधी शस्त्र असे केले आहे. विशेष म्हणजे लगट करण्याची जबरदस्ती करणाऱ्या पुरूषांना चाप बसवण्यासाठी स्त्रिया त्याची खरेदी करीत आहेत.

हे अग्नियंत्र अर्धामीटर अंतरा पर्यंत आगीच्या प्रवाह सोडते. ते महिलांच्या पर्समध्ये सहज राहू शकते. हे छोटे असले तरी १८०० डिग्री सेंटीग्रेड इतक्या तापमानाच्या ज्वाला निर्माण करू शकते. उकळत्या पाण्याचे तापमान १०० डिग्री असते. यावरून यंत्राचा चटका किती भयंकर असेल याची कल्पना येते. यंत्रातून निघणाऱ्या ज्वाला तीस मिनीटे रहातात. अग्नियंत्राची किंमत १० ते ३० युवान इतकीच म्हणजे परवडणारी आहे.

विक्रेत्यांनी यंत्राची खूपच जाहिरातबाजी केली आहे. महिलांवर अतिप्रसंग करणाऱ्याला ठार विद्रुप करा, असा सल्ला ते देत आहेत. चीनी पोलिसांनी यंत्र बेकायदा असल्याचे जाहीर केलेले असले तरी स्त्रियांनी ते विकत घेणे थांबवलेले नाही. चुकून या यंत्राचे बटन दाबू नका, असे आवाहन करणेच पोलिसांच्या हातात राहिले आहे.

लैंगिक अत्याचार करण्याची विकृती असलेल्यांना महिलांपासून चार हात दूर रहावे लागेल नाहीतर जन्माची अद्दल घडू शकते.