चीनी मालावर निर्बंध घाला

0

भुसावळ। चीनच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच असून कैलास मानसरोवर यात्रेला जाणार्‍या भारतीय नागरिकांना सिक्कीम येथील नाथूला खिंडीतून जाण्यास प्रतिबंध केला. त्यानंतर काही दिवसांनी भूटान- भारत- चीन सीमेवर रस्तेबांधणीच्या निमित्ताने घुसखोरी करीत सिक्कीमच्या डोकलाम भागात सीमारेषा पार करुन दोन भारतीय बंकर उध्वस्त केले. त्यामुळे भारत- चीन सिमेवर अनेक दिवसांपासून तणावाची स्थिती निर्माण झाली असून चीनला अद्दल घडविण्यासाठी चिनी वस्तूंवर निर्बंध घालण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीसह राष्ट्रभक्तांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहरातील राष्ट्रभक्त तरुणांनी चिन व पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच आपल्या भावना प्रांताधिकार्‍यांकडे व्यक्त केल्या व निवेदन शासनादरबारी पोहचविण्याची विनंती केली.

देशभरात चीनी वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी
चीन सातत्याने भारताचा विरोध करीत आहे. आतंकवादी अझहर मसूदला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषीत करण्याच्या प्रस्तावाला चीनने राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत विरोध केला. आतंकवाद्यांची पाळेमुळे असलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन नेहमीच बाजू घेत आला आहे. त्यामुळे शासनाने चीनच्या मालावर निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

अधिकार्‍यांची चौकशी करावी
अमरनाथ यात्रेकरुंवर आतंकवाद्यांनी हल्ला करुन यात 7 भाविक ठार झाले आहेत. गुप्तचार यंत्रणांनी या हल्ल्याविषयी जम्मू – काश्मिर शासनाला पूर्वीच सर्तक करुनही हे प्राणघातक हल्ले झाले. सुरक्षा व्यवस्था भेदून आतंकवाद्यांनी भाविकांच्या वाहनांना लक्ष्य केले. याबाबत संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच पाकिस्तान व काश्मीरमधील आतंकवाद्यांना अद्दल घडवावी, भारतीय हद्दीतून पाकिस्तानमध्ये जाणार्‍या नद्यांचे पाणी अडविण्याची मागणी देखील हिंदू जागृती समितीतर्फे करण्यात आली आहे. तसेच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर यांना खोट्या आरोपाखाली आठ वर्षे कारागृहात डांबण्यात येऊन त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. हे षड्यंत्र रचणारे राज्यकर्ते व पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येण्याची मागणी निवेदनात नमूद केली आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देतांना उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, हिंदू जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, शिवसेनेचे उमाकांत शर्मा (नमा), भुषण महाजन, प्रशांत ठाकूर, अक्षय पाटील, शुभम पचेरवाल, भुषण कोळी, क्रिष्णा साळी, रितेश जैन, रोहित महाले, सुरज देशमुख यांसह शहरातील राष्ट्रभक्त तरुणांची उपस्थिती होती. हिंदू जागृती समितीतर्फे या निवेदनाच्या प्रती केेंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय वाणिज्य मंत्री यांना सुध्दा रवाना करण्यात आल्या आहेत.