चीन विरोधात चापेकर चौकात निदर्शने

0

पिंपरी-चिंचवड : कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणार्‍या भारतीय नागरिकांना सिक्कीम येथील नाथूला खिंडीतून जाण्यास चीनने प्रतिबंध केला. तसेच भारताच्या सीमेवर सैन्याची जमवा-जमव करून अप्रत्यक्षपणे युद्धाला कारणीभूत परिस्थिती निर्माण करणार्‍या चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, असे आवाहन हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने करण्यात आली. चिंचवड येथील चापेकर चौकात शनिवारी सायंकाळी हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका कांता मोंढे, सुलभा उबाळे, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुशीला पवार, रणरागिणी शाखेच्या पुणे समन्वयक क्रांती पेटकर, धनश्री कर्वे आदी सहभागी झाल्या होत्या.

चीनची आर्थिक नाकेबंदी करावी
रस्ते बांधणीच्या निमित्ताने घुसखोरी करत चीनने सिक्कीमच्या डोकलाम भागात सीमारेषा पार करून दोन भारतीय बंकर बुलडोझरने उद्ध्वस्त केले. परिणामी भारत आणि चीन सीमेवर अनेक दिवसांपासून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यापुढे जाऊन चीनने सीमेवर रणगाडे आणून त्यांचा सरावही सुरू केला आहे. कुरापतखोर चीनने यापूर्वीच तिबेट गिळंकृत केला. अरुणाचल प्रदेश आणि लडाख येथे सीमावाद चालूच आहेत. चिनीला रोखण्यासाठी भारतीय नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालावा, स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरावा. भारत सरकारने चीनशी असलेल्या व्यापारविषयक धोरणांवर पुनर्विचार करून चीनची आर्थिक नाकेबंदी करावी, अशी मागणी आंदोलनाच्या वेळी करण्यात आली.