नवी दिल्ली – कोरोना फैलाव केल्याचा ठपका असलेल्या चीनमधून अनेक कंपन्यांनी काढता पाय घेण्याच्या तयारी सुरु केली आहे. या कंपन्यांना भारताकडे आकर्षित करण्यासाठी मोदी सरकारने कंबर कसली आहे. चीनमधून भारतात येऊन इच्छिणार्या कंपन्यांना कारखाने उभारण्यासाठी भारतात जमीन उपलब्ध करुन देण्याची तयारी सुरु झाली आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार भारतानने आतापर्यंत ४ लाख ६१ हजार ५८९ हेक्टर जमीन या कंपन्यांना देण्यासाठी निश्चित केली आहे. यापैकी एक लाख १५ हजार १३११ हेक्टर जमीन ही गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये आहे.
भारतामध्ये उद्योग सुरु करायचा असल्यास कारखाना उभारण्यासाठी जमीन मिळवणे हे परदेशी कंपन्यांसाठी सर्वात मोठे आव्हान असते. याच पार्श्वभूमीवर सरकारने आधीच भूखंड निवडून त्याचा ताबा घेण्यासंदर्भातील प्रक्रियेवर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने वेगवेगळ्या राज्यांमधील सरकरी यंत्रणांबरोबर समन्वय साधून भूखंड निश्चित करण्याचे काम सुरु केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर जपान, अमेरिका आणि युरोपमधील अनेक कंपन्या निर्मिती उद्योग स्थापन करण्यासाठी चीनला पर्याय शोधत आहेत. चीनऐवजी इतर कोणत्या देशामध्ये आपल्याला उद्योग सुरु करता येईल का यासंदर्भात अनेक कंपन्या संशोधन करत असल्याचे समजते. याच कंपन्यांना भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे.