चुंचाळेच्या युवकाचा मलकापूरनजीक अपघाती मृत्यू ; माता बचावली

0

भरधाव आयशरने दिली दुचाकीला धडक ; मुलाचा मृतदेह पाहताच मातेचा टाहो

भुसावळ- नातेवाईकांकडे कामानिमित्त गेलेल्या यावल तालुक्यातील चुंचाळे येथील युवकाचा अपघाती मृत्यू झाला तर सुदैवाने माता बचावल्याची घटना मलकापूर शहराजवळील पावर हाऊस कुंडाजवळ शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ऋषीकेश लक्ष्मण कर्नाटके (19 मराठे) याचा जागीच मृत्यू झाला तर त्याची आई बेबाबाई मराठे जखमी झाली आहे. दुचाकीला धडक देणारा आयशर ट्रक मलकापूर पोलिसांनी जप्त केला आहे.

एकूलत्या एक मुलाचा मृतदेह पाहताच मातेने फोडला हंबरडा
चुंचाळे येथील ऋषीकेश हा तरुण आपल्या आईसोबत मलकापूर येथे गेला होता. शनिवारी परतीच्या प्रवासात मलकापूरपासून काही अंतरावर त्यांच्या दुचाकीला भरधाव आयशर वाहनाने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की तरुणाच्या मेंदूचा चेंदामेंदा झाल्याने तो जागीच मरण पावला तर आई बेबाबाई मात्र बाजूला फेकली गेल्याने बचावली. एकुलत्या एक मुलाचा मृतदेह पाहताच मातेने हंबरडा फोडल्याने उपस्थितांनाही गहिवरून आले. नुकत्याच लागलेल्या बारावी परीक्षेच्या निकालात ऋषीकेशही उत्तीर्ण झाल्याचे सांगण्यात आले. त्याच्या मृत्यूची वार्ता कळताच चुंचाळे गावात शोककळा पसरली. मृत तरुणाच्या पश्‍चात आई, वडील व विवाहित बहिण असा परीवार आहे.