पाचोरा- तालुक्यातील चुंचाळे शिवाराच्या सर्वे नं.103/2 मधील शेतातील डीपीवर काम करीत असताना विजेचा प्रवाह अचानक सुरू झाल्याने वीज कंपनीत तात्पुरत्या स्वरुपावर काम करणार्या रुपेश सुकदेव पाटील (वय 24, रा. तारखेडा) या तरुणाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ईश्वर संतोष पाटील यांच्या शेतात असलेल्या डीपीवर कायमस्वरपी असलेले वायरमन राठोड यांच्यासोबत आठ महिन्यांपासून वीज कंपनीत कायमस्वरूपी नसलेले शिकाऊ कामगार रुपेश सुकदेव पाटील (वय 24, रा. तारखेडा) हे जळलेली डीपी उतरवण्याचे काम करीत होते. परवानगीने बंद केलेला वीजपुरवठा अचानक सुरू झाल्याने काम करीत असलेले रुपेश पाटील यांना विजेचा धक्का लागला. ते खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी जवळ असलेले राठोड यांच्या लक्षात ही बाब लक्षात आल्याने त्यांनी ग्रामस्थ व शेतकर्यांच्या मदतीने मृतदेह नगरदेवळा येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. मात्र, त्यास वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मृत घोषीत केले. मृत रुपेशच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परीवार आहे.